सिडनी: अर्शदीप सिंहने कमी वेळेत स्वत:ची ओळख बनवली आहे. टी 20 वर्ल्ड कपआधी या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने टीममध्ये डेब्यु केला. त्याने टी 20 च्या 23 सामन्यात 33 विकेट घेतल्या. अर्शदीप नव्या आणि जुन्या दोन्ही चेंडूंनी विकेट घेण्यात माहीर आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली सुद्धा त्याचा चाहता आहे.
ब्रेट ली ने अर्शदीप संदर्भात नुकताच एक मोलाचा सल्ला दिलाय. या गोलंदाजाला गरजेपेक्षा जास्त सल्ल्यापासून दूर ठेवलं पाहिजे. कारण याचा अर्शदीपवर विपरित परिणाम होऊ शकतो.
ब्रेट ली काय म्हणाले?
ली ने आपलं युट्यूब चॅनल ब्रेट ली लाइव्हवर सांगितलं की, “अनेकदा टीम्सना माहित नसतं, की या युवा खेळाडूंसोबत काय केलं पाहिजे. आपण याआधी पाहिलय, एखादा युवा खेळाडू टीममध्ये आल्यानंतर त्याला टीव्ही, समालोचक, आणि हॉटेलमध्ये सुद्धा सल्ले मिळतात. सगळ्यांनाच त्या गोलंदाजाच भलं व्हावं अशी इच्छा असते. पण जास्त सल्ल्यांचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे अर्शदीपला अतिरिक्त सल्ल्यांपासून वाचवण्याची जबाबदारी हेड कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्माची आहे”
अर्शदीपच्या जीमबद्दल ब्रेट ली ने काय सल्ला दिला?
ब्रेट ली ने, फिटनेससाठी अर्शदीपला जास्त जीम न करण्याचा सल्ला दिला. “काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, मला वाटत की, त्यामुळे अर्शदीपला Action मध्ये मदत मिळू शकते. त्याला जास्त विकेट मिळू शकतात. त्याने जीममध्ये गेलं पाहिजे, पण तिथे जास्त वेळ देऊ नये. आपल्या मसल्सची चिंता करु नये, त्याचा वेगवान गोलंदाजांना फायदा होत नाही” असं ब्रेट ली म्हणाला.
सोशल मीडियामुळे भरकटू नये
अर्शदीप सिंहच करिअर आता सुरु झालय. आशिया कप सुपर 4 मध्ये त्याने आसिफ अलीचा झेल सोडला. त्यानंतर त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. अर्शदीपला सोशल मीडियासाठी अंगी मानसिक कणखरता बाळगण्याचा सल्ला दिला. अर्शदीप सिंहने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळलं पाहिजे, असा सल्ला ब्रेट ली ने दिला.