बंगळुरु: भारत आणि श्रीलंकेत मालिकेतील दुसरा कसोटी (IND vs SL 2nd Test) सामना सुरु आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये आहे. बंगळुरुत सुरु असलेल्या या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या खेळात गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. भारताचा पहिला डाव 252 धावात आटोपला. कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने ही खूप कमी धावसंख्या आहे. पण भारतीय गोलंदाजांनी खासकरुन वेगवान गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावलं. त्यामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. पहिल्या दिवसअखेर श्रीलंकेची (Srilanka) सहाबाद 86 अशी अवस्था झाली होती. शेवटच्या सत्रात 30 षटकांच्या खेळात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेची वाट लावून टाकली. सहापैकी पाच विकेट, तर वेगवान गोलंदाजांनी काढल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil gavaskar) यांनी टीममधील एका 31 वर्षाच्या खेळाडूचं कौतुक केलं.
एकच वेग कायम ठेवून दीर्घ स्पेल टाकू शकतो
चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर गावस्कर स्टार स्पोटर्सवर बोलत होते. सहा षटकात 18 धावा देऊन दोन विकेट काढणाऱ्या मोहम्मद शमीचं त्यांनी कौतुक केलं. “शमीकडे दीर्घ स्पेल म्हणजे एकच वेग कायम ठेवून अनेक षटक गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. मनगटाला झटका देऊन दोन्ही बाजूंना चेंडू कट करण्याचं त्याच्याकडे कौशल्य आहे” असं गावस्कर म्हणाले.
शमी भारतासाठी तेच करतोय
“शामी दीर्घ स्पेलमध्ये गोलंदाजी करु शकतो. तो एकच पेस कायम ठेवून तशी गोलंदाजी करतो. प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर तो प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करु शकतो. असा गोलंदाज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तो उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. फक्त चार षटकांचा स्पेल नव्हे, तर सहा-सात षटकांचा स्पेल टाकणारा गोलंदाज आवश्यक आहे. शामी तेच करतोय असं गावस्कर म्हणाले. तो संघासाठी सर्व काही करतोय. मनगटाला झटका देऊन तो चेंडू आत-बाहेर आणू शकतो. त्याला खेळणं इतकं सोप नाहीय” अशा शब्दात गावस्करांनी तोंडभरुन शामीचं कौतुक केलं.
अविश्वसनीय गोलंदाजी
गावस्करांच्या मते “सध्याची भारतीय गोलंदाजी अविश्वसनीय वाटते. नव्या चेंडूने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते, त्याला तोड नाहीय” जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी खेळतायत. मोहम्मद सिराज त्याच्या संधीची प्रतिक्षा करतोय. त्याशिवाय इशांत शर्मा, उमेश यादवही असल्याचं गावस्कर म्हणाले.