नवी दिल्ली : चेतेश्वर पुजारावर आता दुप्पट दबाव आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टेस्ट टीममधून त्याला ड्रॉप करण्यात आलं आहे. पुन्हा टीम इंडियात स्थान मिळवण्याच चेतेश्वर पुजारासमोर मुख्य लक्ष्य आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील खराब प्रदर्शनामुळे चेतेश्वर पुजाराला टीममधून ड्रॉप करण्यात आलं. WTC 2023 फायनलच्या काही महिने आधीपासून चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये होता. त्याने तिथे काऊंटी क्रिकेट खेळताना शतकं झळकावली होती.
मात्र, तरीही वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपच्या फायनलमध्ये पूजारा अपयशी ठरला. त्याच्या अनुभवाचा महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाला काही फायदा झाला नाही. टीम इंडियाचा सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाला.
विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी
चेतेश्वर पुजाराला त्याची किंमत टीममधील आपलं स्थान गमावून चुकवावी लागली आहे. चेतेश्वर पुजारावर त्याच्या वडिलांनी विश्वास दाखवला आहे. त्यामुळे पुजारावर त्यांचा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी वाढली आहे. माझा मुलगा पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करेल, असं अरविंद पूजारा यांनी म्हटलं आहे.
म्हणून हा निर्णय घेतला?
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पुजाराला टीममधून ड्रॉप केल्यानंतर बरच काही बोलल जातय. टीम मॅनेजमेंटने पुजाराला आधीच कल्पना दिली होती, असं म्हटलं जातय. भारतीय मॅनेजमेंटला आपल्या युवा खेळाडूंना आजमावायच आहे, म्हणून हा निर्णय घेतला, असं सुद्धा बोलल जातय.
कमबॅकची तयारी सुरु
कारण काहीही असो, चेतेश्वर पुजाराने पुन्हा टीम इंडियात कमबॅकची तयारी सुरु केलीय. चेतेश्वर पुजारा आता देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळेल. तयारीचा व्हिडिओ सुद्धा त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
अरविंद पूजारा काय म्हणाले?
“चेतेश्वर मानसिक दुष्ट्या खूप मजबूत आहे. मी सिलेक्शनबद्दल काही बोलणार नाही. मला जे दिसतय, त्यात पुजारा चांगली बॅटिंग करतोय. वेस्ट इंडिजसाठी टीमची निवड झाल्यानंतर त्याने नेट्समध्ये उतरून सराव सुरु केलाय. आता तो दुलीप ट्रॉफी आणि काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणार आहे. एक वडिल आणि कोच म्हणून तो टीम इंडियात पुनरागमन न करण्याच मला कुठलही कारण दिसत नाही” असं अरविंद पूजारा TOI ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
चेतेश्वर पुजाराला वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरीजसाठी ड्रॉप केल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. सुनील गावस्कर यांच नाव, या यादीत सर्वात वर आहे. “पुजाराचे लाखो फॉलोअर्स नाहीत, जे त्याच्यासाठी घोषणा देतील, म्हणून त्याला ड्रॉप करण्यात आलं” असं गावस्कर म्हणाले.