मुंबई: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत 14 ऑक्टोबरला तुफानी बॅटिंग पहायला मिळाली. एकाचवेळी दोन बॅट्समननी नागलँडची टीम आणि त्यांच्या गोलंदाजांची वाट लावून टाकली. सौराष्ट्र आणि नागालँडमध्ये (Saurashtra vs Nagaland) हा सामना होता. या सामन्यात सौराष्ट्रच्या टीमने पहिली बॅटिंग केली. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) या मॅचमध्ये ओपनिगला उतरला होता. चेतेश्वर पुजाराकडे कसोटी (Test) फलंदाज म्हणून पाहिलं जातं. पण पुजाराने या मॅचमध्ये T20 क्रिकेटला साजेशी फलंदाजी केली.
पुजाराची आक्रमक बॅटिंग
या T20 मॅचमध्ये त्याने आक्रमक बॅटिंग केली. चेतेश्वर पुजाराचा हा अंदाज पहिल्यांदा पहायला मिळाला. फक्त एकट्या पुजारानेच नागालँडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला नाही. त्याच्यासोबत समर्थ व्यासने सुद्धा नागालँडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला.
पुढची 10 षटकं मैदानात धावांचा पाऊस
नागालँड विरुद्ध सौराष्ट्राच चांगली सुरुवात झाली नाही. सलामीच्या जोडीने फक्त 14 धावा केल्या. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि समर्थ व्यासच्या जोडीने खेळपट्टीवर पाय रोवले. नागालँडच्या गोलंदाजांचा या जोडीने चांगलाच समाचार घेतला. सौराष्ट्राची पहिली विकेट दुसऱ्या ओव्हरमध्ये गेली. त्यानंतर पुढची 10 षटकं मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पहायला मिळाला.
पुजारा-समर्थची मोठी भागीदारी
पुजारा आणि समर्थने दुसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. 86 चेंडूत त्यांनी या धावा केल्या. दोघांनी नागालँडच्या गोलंदाजीवर 9 षटकार आणि 16 चौकार लगावले. दोघांनी फक्त चौकार-षटकारांनी 118 धावा वसूल केल्या.
पुजारा आणि समर्थने किती धावा केल्या?
चेतेश्वर पुजाराने 35 चेंडूत 62 धावा केल्या. 177.14 च्या स्ट्राइक रेटने पुजाराने 9 चौकार आणि 2 षटकार खेचले. त्याने 27 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. समर्थ व्यासने 7 चौकार आणि 7 षटकार खेचले. त्याने 51 चेंडूत 97 धावा चोपल्या. समर्थचा स्ट्राइक रेट 190.19 चा होता.
समर्थ आणि पुजाराच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधल हे पहिलं अर्धशतक आहे. पुजारा आणि समर्थच्या इनिंगच्या बळावर सौराष्ट्रने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 203 धावा केल्या.