नवी दिल्ली: क्रिकेटच्या खेळाट हॅट्रिक होत असते, पण हॅट्रिक जेव्हा फायनलमध्ये होते, तेव्हा त्याची मजाच वेगळी असते. आज विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये अशीच हॅट्रिक पहायला मिळाली. सौराष्ट्राचा गोलंदाज चिराग जानीने ही हॅट्रिक घेतली. याच मॅचमध्ये महाराष्ट्राचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडने शानदार शतक झळकावलं. त्याच्या शतकानंतर लगेच चिरागने आपली हॅट्रिक पूर्ण केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या टीमला 250 धावांची वेस ओलांडता आली नाही.
कुठल्या ओव्हरमध्ये घेतली हॅट्रिक?
चिराग जानीने महाराष्ट्राविरुद्ध 10 ओव्हर्समध्ये 43 धावा देऊन 3 विकेट काढल्या. त्याला हॅट्रिकच्या बळावर हे तिन्ही विकेट मिळाले. त्याची ही व्यक्तीगत शेवटची ओव्हर होती. महाराष्ट्राच्या इनिंगमधील 49 व्या षटकात ही हॅट्रिक झाली.
कोणत्या तीन फलंदाजांच्या विकेट काढल्या?
ऋतुराज गायकवाड शतक बनवून पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर चिराग जानीने ही हॅट्रिक घेतली. तो त्याच व्यक्तीगत शेवटचं आणि इनिंगमधील 49 वी ओव्हर टाकत होता. त्याने एसएस नवालेला आधी आऊट केलं. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर हंगरगेकर आणि तिसऱ्या चेंडूवर ओस्तवालची विकेट काढली. महाराष्ट्राच्या लोअर ऑर्डरमधील फलंदाजांचे हे तिन्ही विकेट होते.
चिरागचा हा कितवा सामना?
फायनल खेळणाऱ्या चिराग जानीचा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील हा 10 वा सामना होता. त्याने 10 सामन्यात 10 विकेट घेतल्या. यात एक हॅट्रिक आहे. याआधी क्वार्टर फायनल मॅचमध्ये त्याने 3 विकेट घेतले होते.
ऋतुराजच सलग तिसरं शतकं
विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये ऋतुराजने 131 चेंडूत 108 धावा केल्या. यात 7 चौकार आणि 4 षटकार आहेत. महाराष्ट्राच्या टीमने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 9 बाद 248 धावा केल्या आहेत. सौराष्ट्राच्या टीमला विजयासाठी 249 धावांचे लक्ष्य दिले आहे.