मुंबई : हाताच्या चौथ्या बोटाचं थेट हृदयाशी कनेक्शन असतं असं म्हटलं जातं. त्यामुळेच त्या बोटाला रिंग फिंगर म्हटलं जातं. साखरपुडा आणि लग्नात याच बोटात अंगठी घातली जाते. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने साखरपुड्यात चक्क अंगठी घालण्यास नकार दिला होता. कदाचित अनेकांना हा किस्सा माहीत नसेल. सचिन तेंडुलकरचा आज 50वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सचिनचा हा अत्यंत हृदयस्पर्शी किस्सा वाचाच. तुम्हालाही हा किस्सा वाचून गंमत वाटल्याशिवाय राहणार नाही.
सचिन तेंडुलकर आणि अंजली यांची साखरपुडा होता. तेव्हा सचिनने साखरपुड्यात अंगठी घालण्यास नकार दिला. तेव्हा अंजलीने सचिनच्या हातात कडं घातलं होतं. सचिननेच हा किस्सा सांगितला होता. त्यामागचं कारणही सचिनने दिलं होतं. सचिनने सांगितलेलं हे कारणही रंजक होतं. सचिन आणि अंजलीची पहिली भेट 1990मध्ये झाली होती. त्यानंतर या दोघांनी 1995मध्ये लग्न केलं होतं. 24 एप्रिल 1973ला सचिनचा जन्म झाला. आज सचिनला 50 वर्ष पूर्ण होत आहे. सचिन हा अत्यंत कुटुंब वत्सल आहे.
सचिनच्या साखरपुड्याचा हा किस्सा प्रसिद्ध आहे. सचिननेच अंजलीला साखरपुड्यात अंगठी नव्हे तर कडं घालावं असं सांगितलं होतं. अंगठी कदाचित माझ्याकडून हरवेल. फलंदाजी करताना अंगठी काढून ठेवावी लागेल. अशावेळी ती गहाळ होऊ शकते. पण फलंदाजी करतानाही कडं माझ्या हातातच राहील, असं सचिनने अंजलीला सांगितलं होतं. सचिनचं हे म्हणणं अंजलीलाही पटलं होतं. त्यामुळे तिने साखरपुड्यात चक्क सचिनच्या हातात कडं घातलं होतं.
सचिन तेंडुलकर आणि अंजली यांची पहिली भेट मुंबई विमानतळावर झाली होती. सचिन पहिल्या इंटरनॅशनल दौऱ्याहून परतत होता. त्यावेळी अंजली तिच्या आईला घेण्यासाठी विमानतळावर गेली होती. त्यानंतर हे दोघे एका कॉमन मित्राच्या माध्यमातून भेटले. त्यावेळी अंजलीची क्रिकेटमध्ये काहीच रुची नव्हती. सचिनसोबत डेट करताना मात्र, तिने क्रिकेटचे सर्व बारकावे समजून घेतले.
सचिनचा बालपणीचा आणखी एक किस्सा प्रसिद्ध आहे. लहानपणी इतर मुलांप्रमाणे सचिनलाही सायकल घेण्याची इच्छा अनावर झाली. मात्र, त्याचे वडील त्याकडे दुर्लक्ष करायचे. वडिलांकडून वारंवार आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं पाहून सचिनला भयंकर राग आला. एक दिवस त्याने सायकल घेण्याचंच ठरवलं. सायकल नाही मिळाली तर बाहेर खेळायलाच जायचं नाही, असं त्याने ठरवलं. बाल्कनीत उभं राहून तो मित्रांना सायकल चालवताना पाहायचा.
एक दिवस बाल्कनीत उभा असताना सचिनचं डोकं बाल्कनीच्या ग्रीलमध्ये फसलं. त्यामुळे घरचे सर्व घाबरले. त्यावेळी सचिनचं घर चौथ्या मजल्यावर होतं. तब्बल 30 मिनिटे सचिनचं डोकं बाल्कनीत फसलं होतं. तेल लावून लावून त्याचं डोकं बाहेर काढलं. त्यानंतर त्याच्या वडिलांनी अखेर त्याला सायकल विकत घेऊन दिली होती.