मुंबई : यंदाच्या आयपीएलचे (IPL 2022) आयोजन भारतातच करण्याच्या बीसीसीआयचा (BCCI) इरादा असला तरी दुसरा पर्याय म्हणून दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) विचार केला जात आहे. आयपीएल 2022 साठी दुसरा पर्याय म्हणून दक्षिण आफ्रिकेचे नाव आघाडीवर आहे. खुद्द बीसीसीआयनेही याबाबत आपला इरादा व्यक्त केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने (Cricket South Africa) आयपीएल आयोजित करण्याची आपली योजना बीसीसीआयसमोर ठेवली आहे. भारतात आयपीएलच्या आयोजनास अडचणी आल्यावरच हा दुसरा पर्याय निवडण्यात येणार आहे. त्यामुळेच बीसीसीआयने अंतिम स्थळ निश्चित करण्यासाठी 20 फेब्रुवारीपर्यंतचा अवधी घेतला आहे. 20 फेब्रुवारीपूर्वी आयपीएल 2022 चा मेगा लिलाव संपणार आहे. म्हणजेच, सर्व 10 संघ त्यांच्या संपूर्ण टीमसह दिसतील. म्हणजेच कोणता खेळाडू कोणत्या संघात आहे, हे स्पष्ट होईल.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (CSA) बीसीसीआयकडे प्रस्ताव तयार करून पाठवला आहे. ‘इनसाइडस्पोर्ट’ने (Insidesport) क्रिकबझच्या हवाल्याने म्हटले आहे, की क्रिकेट दक्षिण आफ्रिका अतिशय कमी पैशात ही स्पर्धा आयोजित करेल. दक्षिण आफ्रिकेत आयपीएल आयोजित केल्यास विमान प्रवास, हॉटेल आणि इतर सुविधांवर फारसा खर्च होणार नाही. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सांगितले की आयपीएल जोहान्सबर्ग आणि आसपासच्या 4 ठिकाणी आयोजित केली जाईल. सर्वाधिक सामने जोहान्सबर्ग येथे होणार आहेत. त्याशिवाय काही सामने सेंच्युरियन, विलोमूर आणि सेन्वेस क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील.
बीसीसीआय आयपीएल 2022 भारतातच आयोजित करण्याच्या मूडमध्ये आहे. परंतु, जर काही अडचणी आल्या तर, दक्षिण आफ्रिकेचा पर्याय समोर असेल. गेल्या शनिवारच्या बैठकीनंतर, बीसीसीआयने सर्व फ्रेंचायझींना सांगितले आहे, की ते 20 फेब्रुवारीपर्यंत स्थळाबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होइल. दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच सांगितले आहे, की आयपीएल मार्च 2022 च्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 27 मार्च रोजी असेल. हे सामने मेपर्यंत चालणार आहेत. भारतात कोरोनाचा धोका आहे. असे असूनही, हा कार्यक्रम भारतातच व्हावा, अशी अनेक फ्रेंचायझी मालकांची इच्छा आहे. मुंबई आणि पुण्यातील रिकाम्या स्टेडियममध्ये ही स्पर्धा होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
ICC Women’s Cricketer 2021: विराट-रोहितला जमलं नाही ते सांगलीच्या स्मृती मानधनाने करुन दाखवलं