नवी दिल्ली: क्रिकेट विश्वात सध्या एका कोचची भरपूर चर्चा आहे. त्या कोचच नाव आहे, योगराज सिंग. अलीकडेच योगराज यांनी अर्जुन तेंडुलकरला प्रशिक्षण दिलं. 1980 च्या दशकात योगराज सिंग भारताकडून कसोटी क्रिकेट सामना खेळले होते. आजची युवा पिढी योगराज सिंग यांना क्रिकेटर युवराज सिंगचे वडिल म्हणून ओळखते. युवराज सिंग याला यशस्वी क्रिकेटपटू बनवण्यात योगराज सिंग यांच मोठ योगदान आहे. एक अशीही वेळ होती, जेव्हा युवराज आपल्या वडिलांचा द्वेष करायचा.
मुलामध्ये ते स्वप्न पाहिलं
टेस्ट क्रिकेटर, कोच, अभिनेता….ही योगराज सिंग यांची ओळख आहे. पण एक वडिल म्हणून योगराज सिंग खूपच वेगळे होते. क्रिकेट त्यांच्या नसानसात भिनलं होतं. भारतासाठी ते टेस्ट आणि वनडे क्रिकेट खेळले. पण दीर्घकाळ त्यांना भारताच प्रतिनिधीत्व करता आलं नाही. ही सल त्यांच्या मनात होती. पण ते निराश झाले नाहीत. काही वर्षांनी त्यांनी हेच स्वप्न आपल्या मुलासाठी पाहिलं. युवराज सिंगने अंडर 14 गटात स्केटिंगमध्ये अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या.
‘ते कोणी आपल्या मुलांसोबत करु नये’
युवराज सिंग लाखो क्रिकेटर्सचा रोल मॉडेल होता. त्याने वडिलांसोबतच्या आपल्या नात्याबद्दल अनेकदा सांगितलं आहे. अनुपम खेर यांना दिलेल्या मुलाखतीत तो वडिलांसोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलला होता. “माझ्या वडिलांनी माझ्यासोबत जे केलं, ते कोणी आपल्या मुलांसोबत करु नये. पण मला कदाचित क्रिकेटच खेळायचं होतं. म्हणून माझ्यासोबत ते सर्व झालं. आज मी जे काही आहे, त्याचं सगळं श्रेय वडिलांना जातं”
एका प्रश्नाला उत्तर देताना युवराज म्हणाला की, “एकवेळ अशी सुद्धा होती, जेव्हा मी माझ्या वडिलांचा द्वेष करायचो. कुठल्याही वडिलांनी आपल्या मुलावर त्यांची मर्जी लादू नये, असं मला वाटायच”
आई आमचा खर्च उचलण्याच्या स्थितीमध्ये नव्हती
“युवराज सिंग 15-16 वर्षांचा असताना, वडिल आणि आईने स्वतंत्र रहायला सुरुवात केली. युवी त्याच्या आईच्या खूप जवळ होता. पण इच्छा नसताना वडिलांसोबत रहायचा” असं युवीने मुलाखतीत सांगितलं. “मला माझ्या वडिलांसोबत रहायच नव्हत. पण आई आमचा खर्च उचलण्याच्या स्थितीमध्ये नव्हती. म्हणून मी वडिलांसोबत राहीलो. त्यावेळी माझ्यासाठी खूप कठीण दिवस होते. फक्त क्रिकेट खेळण्यासाठीच्या सर्व सुविधा मला मिळायच्या” असं युवराजने सांगितलं. टीम इंडियाकडून खेळायला सुरुवात केल्यानंतर पैसे मिळाले, तेव्हा घर विकत घेऊन आईसोबत रहायला लागलो, असं युवीने सांगितलं.
योगराज यांची कठोर शिस्त
योगराज सिंग अर्जुन तेंडुलकरला कोचिंग दिल्यामुळे चर्चेत आहे. अर्जुन तेंडुलकरने रणजी डेब्युमध्येच शतक झळकावलं. अर्जुनच्या या यशामागे योगराज सिंग यांच योगदान असल्याचं मानलं जातय. त्यांची कठोर शिस्त आणि दूरदृष्टीने युवराजला एका यशस्वी क्रिकेटपटू बनवलं.