मुंबई: 90 च्या दशकात वनडे क्रिकेट (ODI Cricket) मध्ये मोठा बदल घडवून आणणारा श्रीलंकेचा सलामीवीर सनथ जयसूर्याने (Sanath jayasuriya) भारताचे आभार मानलेत. संकटकाळात भारताने श्रीलंकेच्या मदतीसाठी हात पुढे केलाय, त्याबद्दल मी आभार मानतो, असं सनथ जयसूर्या म्हणाला. “श्रीलंकेत (Sri lanka) जे घडतय, ते जगातील सगळेच देश जवळून बघतायत. या परिस्थितीत मदतीसाठी आम्ही भारताचे आभारी आहोत” असं श्रीलंकेच्या या माजी आक्रमक फलंदाजाने म्हटलं आहे. 90 च्या दशकात वनडे क्रिकेट मध्ये सुरुवातीच्या 15 षटकात फटकेबाजी करण्याची सुरुवात सनथ जयसूर्याने केली. खेळाडू रिंगणात असताना, डोक्यावरुन मोठे फटके खेळण्याची सुरुवात जयसूर्यापासून झाली. या नंतर वनडे क्रिकेटच स्वरुप मोठ्या प्रमाणात बदललं. 300, 350 धावांचा पाठलाग करणं अनेक संघांना शक्य झालं.
सनथ जयसूर्याने ज्या मदतीबद्दल भारताचे आभार मानलेत, त्या बद्दल जाणून घेऊया. आर्थिक संकटात अडकलेल्या श्रीलंकेला भारताने 3.8 अब्ज अमेरिकन डॉलरची मदत देण्याची तयारी दाखवली आहे.
श्रीलंकेत जी परिस्थिती निर्माण झालीय, त्याची कल्पना आहे. कठीण परिस्थितीतून श्रीलंकेला बाहेर काढण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. श्रीलंकेत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर भारताचं बारीक लक्ष आहे. भारताच्या याच कृतीच सनथ जयसूर्याने कौतुक केलय.
“IMF, भारत आणि अन्य देश श्रीलंकेची मदत करत आहेत. भारत सकंट सुरु झाल्यापासूनच मदत करतोय. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. श्रीलंका कठीण परिस्थितीत असताना, भारताने दिलेलं योगदान खूप मोठं आहे” असं जयसूर्याने म्हटलं आहे. भारताने श्रीलंकेला डीजेल आणि पेट्रोलची मदत केलीय. श्रीलंकन जनता पेट्रोलियम पदार्थांच्या कमतरतेचा सामना करतेय. भारताने मोठ्या प्रमाणात श्रीलंकेत पेट्रोल पाठवलं आहे.