चेन्नई : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सवर 4 विकेट राखून विजय मिळवला. शाहरुख खान (2) आणि सिंकदर रझा (13) या पंजाबच्या जोडीने अखेरच्या चेंडूवर 3 धावा काढून पंजाबला थरारक विजय मिळवून दिला. आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्समध्ये सामना झाला. हा 41 वा सामना होता. चेन्नईकडून माथीशा पाथीराणा लास्ट ओव्हर टाकत होता. अखेरच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूत 9 धावांची गरज होती.
शाहरुख खान आणि सिंकदर रझाची जोडी मैदानात होती. रझाने लास्ट बॉलवर 3 धावा घेऊन पंजाबचा विजय सुनिश्चित केला. चेन्नईला सलग दुसऱ्यांदा आपल्या घरात पराभवाचा सामना करावा लागला.
पंजाबची चांगली सुरुवात
पंजाब किंग्सला प्रभसिमरन सिंग आणि कॅप्टन शिखर धवन यांनी 50 धावांची दमदार सलामी दिली. कॅप्टन शिखर धवनच्या रुपाने पंजाबची पहिली विकेट गेली. धवन चांगली बॅटिंग करत होता. तृषार देशपांडेने त्याला पाथिरराणाकरवी झेलबाद केलं. धवनने 15 चेंडूत 28 धावा केल्या. यात 4 फोर आणि 1 सिक्स आहे. 5 ओव्हर अखेरीस पंजाबच्या 1 बाद 54 धावा झाल्या होत्या.
लिव्हिंगस्टोनची छोटी पण उपयुक्त खेळी
दमदार बॅटिंग करणाऱ्या प्रभसिमरन सिंगला जाडेजाने स्टम्पआऊट केलं. त्याने 24 चेंडूत 42 धावा केल्या. त्यानंतर मधल्या ओव्हर्समध्ये पंजाबची धावगती मंदावलीय असं दिसत होतं. पण लियाम लिव्हिंगस्टोनने 24 चेंडूत 40 धावांची उपयुक्त खेळी केली. यात त्याने 1 फोर आणि 4 सिक्स मारले. सॅम करन 29 आणि जितेश शर्मा 21 धावांची महत्वपूर्ण खेळी खेळले. त्यामुळे अखेरीस पंजाबला विजय मिळवता आला.
धोनीने जिंकला टॉस
चेन्नईचा कॅप्टन एमएस धोनीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईचे ओपनर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी चेन्नईला अपेक्षित सुरुवात दिली. पावरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये चेन्नईच्या बिनबाद 57 धावा झाल्या होत्या. दोघे चांगल्या फॉर्ममध्ये होते. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 86 धावांची सलामी दिली.
ऋतुराजची चांगली बॅटिंग
ऋतुराजच्या रुपाने चेन्नईची पहिली विकेट गेली. ऋतुराजे 31 चेंडूत 37 धावना करताना 4 फोर आणि 1 सिक्स मारला. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला डेवॉन कॉनवेने आपली धुवाधार बॅटिंग कायम ठेवली. त्याने पंजाबच्या एकाही गोलंदाजाला दाद दिली नाही. वन डाऊन आलेल्या शिवम दुबेने सुद्धा चांगली बॅटिंग केली.
डेवॉन कॉनवेने धुतलं
15 व्या ओव्हरमध्ये दमदार फलंदाजी करणारा CSK चा शिवम दुबे आऊट झाला. अर्शदीपच्या गोलंदाजीवर त्याने शाहरुखकडे झेल दिला. 17 चेंडूत 28 धावा करताना त्याने 1 फोर आणि 2 सिक्स मारले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्सने 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 200 धावा केल्या आहेत. ओपनर डेवॉन कॉनवेच्या बळावर चेन्नईने विशाल धावसंख्या उभारली. त्याने 52 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या. यात 16 फोर आणि 1 सिक्स होते.