मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) यंदाचा 15 वा सीजन आहे. आतापर्यंत झालेल्या 14 सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. टीममधील मोठ्या नावांमुळे RCB च्या संघाची नेहमी चर्चा होते. पण विजेतेपद अजूनही या टीमपासून दूरच आहे. आरसीबी यंदाच्या सीजनमध्ये चांगली कामगिरी करत आहे. काल चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध झालेल्या सामन्यात आरसीबीचा 23 धावांनी पराभव झाला. यंदाच्या मोसमातील फाफ डू प्लेसिसच्या आरसीबीचा हा दुसरा पराभव आहे. याआधी तिन्ही सामने त्यांनी जिंकले आहेत. सलामीच्या सामन्यात पंजाब किंग्सने आरसीबीचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा केली. काल मात्र आरसीबीच्या गोलंदाजांनी सुमार कामगिरी केली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी 217 धावांचे विशाल लक्ष्य दिले. या धावसंख्येचा पाठलाग करताना RCB ने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 193 धावा केल्या.
या सामन्यादरम्यान आरसीबीच्या एका महिला फॅनने लक्ष वेधून घेतलं. तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चेन्नई आणि बँगलोर दरम्यानच्या सामन्यावेळी एक महिला फॅन पोस्टर घेऊन मैदानात पोहोचली होती. त्यावर तिने लिहिलेल्या मेसेजमुळे कॅमेऱ्याच्या नजरा तिच्याकडे वळल्या. RCB चा संघ आयपीएलची ट्रॉफी जिंकत नाही, तो पर्यंत लग्न करणार नाही, असा मेसेज त्यावर लिहिला होता. सामन्या दरम्यान सगळ्यांचेच लक्ष या पोस्टरने वेधून घेतलं.
यंदाच्या सीजनमध्ये आरसीबीने आतापर्यंत पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू फाफ डू प्लेसिसकडे आरसीबीचे नेतृत्व आहे. स्वत: डू प्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिकसारखे अव्वल फलंदाज या संघामध्ये आहेत. कुठल्याही संघाच्या गोलंदाजांवर आक्रमण करण्याची क्षमता या फलंदाजांमध्ये आहे.
Really worried about her parents right now.. #CSKvsRCB pic.twitter.com/fThl53BlTX
— Amit Mishra (@MishiAmit) April 12, 2022
चेन्नई सुपर किंग्सकडून काल रॉबिन उथाप्पा आणि शिवम दुबेने दमदार फलंदाजी केली. दोघांनी आरसीबीची गोलंदाजी फोडून काढली. शिवम दुबेने 46 चेंडूत नाबाद 95 धावांची खेळी केली. यात पाच चौकार आणि आठ षटकार होते. रॉबिन उथाप्पाने 50 चेंडूत 88 धावा फटकावल्या.यात चार चौकार आणि नऊ षटकार होते. चेन्नईची सुरुवात चांगली झाली नव्हती. सलामीवीर ऋतुराज गायकवाड 17 धावांवर तंबूत परतला होता. मोईन अली सुद्धा फारशी चमक दाखवू शकला नव्हता. या परिस्थितीतून शिवम दुबे आणि उथाप्पाने संघाला बाहेर काढलं.