मुंबई: आशिया कप 2022 (Asia cup) साठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. भारताच्या संघात जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल सारखे गोलंदाज नाहीयत. कारण दोघेही दुखापतग्रस्त आहेत. केएल राहुलच (KL Rahul) पुनरागमन झालय, ही चांगली बाब आहे. विराट कोहली सुद्धा विश्रांती नंतर टीम मध्ये सहभागी होणार आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार टीम इंडियात अजूनही बदल होऊ शकतात. स्टँडबायवर असलेल्या दीपक चाहरला (Deepak Chahar) संघात स्थान मिळू शकतं. दुखापतीमुळे मागचे 6 महिने दीपक चाहर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब होता.
दीपक चाहरला झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सीरीजसाठी संघात स्थान मिळालय. वृत्तानुसार, या खेळाडूला आशिया कप साठीच्या संघात अजूनही जागा मिळू शकते. इनसाइड स्पोर्टच्या वृत्तानुसार, दीपक चाहरने झिम्बाब्वे दौऱ्यावर चांगली कामगिरी केली, तर आशिया कप साठीच्या संघात त्याला स्थान मिळू शकतं. सध्या त्याला स्टँडबायवर ठेवण्यात आलं आहे. झिम्बाब्वे मध्ये त्याने चांगली कामगिरी केली, तर आवेश खानच्या जागी त्याला संधी मिळू शकते. दीपक चाहर पावरप्ले मध्ये चांगली गोलंदाजी करतो, त्याशिवाय तो उत्तम फलंदाजही आहे. ज्याचा फायदा टीम इंडियाला मिळू शकतो.
जसप्रीत बुमराह आशिया कप मध्ये खेळत नाहीय. दीपक चाहरचा संघात समावेश झाल्यास, टीम अजून बळकट होईल. सिलेक्शन कमिटीच्या एका सदस्याने इनसाइड स्पोर्टशी बोलताना सांगितलं की, “दीपक चाहरला आशिया कपसाठी थेट निवडणं शक्य नव्हतं. कारण तो दुखापतीनंतर पुनरागमन करतोय. स्पर्धेआधी बदल करण्याचा एक पर्याय आमच्याकडे आहे. दीपकला झिम्बाब्वे दौऱ्यात संधी मिळाली आहे. त्यांने चांगली कामगिरी केली. तो फॉर्म मध्ये असल्याचं जाणवलं, तर आम्ही त्याच्याबद्दल नक्कीच विचार करु”
दीपक चाहर आता पूर्णपणे फिट आहे, ही चांगली बाब आहे. दीपक चाहरने म्हटलं होतं की, तो फिट आहे. त्याला वाटलं असत, तर तो 2-3 आठवडे आधी पुनरागमन करु शकला असता. वेस्ट इंडिज विरुद्ध खेळू शकला असता. पण त्याने त्याच्या फिटनेसला जास्त महत्त्व दिलं. आता तो पूर्णपणे तयार आहे. दीपक चाहरने आतापर्यंत 20 टी 20 सामन्यात 26 विकेट घेतले आहेत. 8 व्या क्रमांकावर येऊन तो चांगली फलंदाजी सुद्धा करु शकतो.