मुंबई: रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठोपाठ टीम इंडियाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा आणखी एक प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे आगामी टी 20 वर्ल्ड कपला (T20 World cup) मुकणार आहे. दीपक चाहरच्या पायाचा घोटा (Ankle) दुखावला आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाहीय. ‘स्पोर्ट्स तक’ने हे वृत्त दिलय.
ऑस्ट्रेलियाला जाणारं विमान पकडता येणार नाही
याच दुखापतीमुळे दीपक चाहर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत खेळू शकला नाही. त्याला ऑस्ट्रेलियाला जाणारं विमान पकडता येणार नाही. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होणार आहे.
बुमराहच्या जागी तो प्रबळ दावेदार होता
रिझर्व्ह स्टँडबाय खेळाडूंमध्ये दीपक चाहरचा समावेश करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह बॅक स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला.
बुमराहच्या जागी मोहम्मद शमी आणि दीपक चाहर यांची नाव चर्चेत होती. जसप्रीत बुमराहची जागा घेण्यासाठी दीपक चाहर प्रबळ दावेदार होता. गोलंदाजी बरोबर प्रसंगी तो फलंदाजी सुद्धा उत्तम करु शकतो. पण अँकलच्या दुखापतीमुळे तो वर्ल्ड कपला मुकणार आहे.
मुंबईचा खेळाडू घेणार त्याची जागा
दीपक चाहर यापूर्वी दुखापतीमुळेच आयपीएलच्या संपूर्ण सीजनला मुकला. चार-पाच महिन्यानंतर झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सीरीजमधून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. दीपक चाहर तेव्हापासून चांगल्या फॉर्ममध्ये होता. रिझर्व्ह खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या वर्ल्ड कप टीममध्ये त्याला स्थान देण्यात आलं होतं.
दीपक चाहर आता जाणार नाहीय. त्याची जागा मुंबईचा शार्दुल ठाकूर घेणार आहे. शार्दुल ठाकूरने नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये चांगली कामगिरी केली. तो सुद्धा गोलंदाजी बरोबर उपयुक्त फलंदाजी करू शकतो.
ते तिघे ऑस्ट्रेलियाला होणार रवाना
मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर येत्या 13 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. सध्या टीम इंडिया पर्थमध्ये टी 20 वर्ल्ड कपची तयारी करतेय. त्या ठिकाणी हे तिन्ही गोलंदाज टीममध्ये सहभागी होतील.