कोलकाता : सध्या इंडियन प्रीमियर लीग 2023 चा सीजन सुरु आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या टीमसोबत आहे. सौरव गांगुली दिल्लीच्या टीमसोबत वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतोय. या दरम्यान त्याच्या सुरक्षेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलाय. सरकारने सौरव गांगुलीची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
सौरव गांगुलीला Y कॅटेगरीची सुरक्षा होती. पश्चिम बंगाल सरकारने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन सौरव गांगुलीला Z कॅटेगरीच सुरक्षा कवच दिलं आहे. सौरव गांगुली सध्या दिल्ली टीमसोबत आहे. तो दिल्ली कॅपिटल्सचा डायरेक्टर आहे. सरकारकडून राजकीय नेते, अभिनेते, समाजसेवक आणि सेलिब्रिटी यांना सुरक्षा दिली जाते.
नव्या कॅटेगरीमध्ये सौरव सोबत किती पोलीस असतील?
“VVIP च्या सुरक्षेची मुदत संपली होती. प्रोटोकॉलनुसार, आढावा घेण्यात आला. त्यानंतर सौरव गांगुलीची सुरक्षा वाढवून झेड कॅटेगरी करण्याचा निर्णय घेतला” असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. नव्या झेड सुरक्षेतंर्गत 8 ते 10 पोलीस अधिकारी सौरव गांगुली सोबत असतील, अशी माहिती प्रवक्त्याने दिली.
सौरव गांगुलीच्या बेहाला येथील निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतो. Y कॅटेगरीमध्ये त्याच्या सुरक्षेसाठी तीन स्पेशल ब्रांचचे अधिकारी होते.
सौरव गांगुलीला कधीपासून मिळणार नवीन सुरक्षा?
“सौरव गांगुली सध्या आपली टीम दिल्ली कॅपिटल्ससोबत प्रवास करतोय. 21 मे रोजी, तो कोलकाता येथे परतेल. त्याच दिवसापासून त्याच्यासाठी झेड कॅटेगरीची सुरक्षा असेल” असं अधिकाऱ्याने सांगितलं. IPL 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे दोन सामने बाकी आहेत. एक पंजाब किंग्स आणि दुसरा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सामना बाकी आहे.