मुंबई: IPL 2022 स्पर्धेवर कोरोना व्हायरसचा (Corona virus) पहिला साइड इफेक्ट होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्समध्ये (DC vs PBKS) होणारा सामना पुण्याऐवजी (Pune) मुंबईत होऊ शकतो. दिल्लीचा संपूर्ण संघ पुण्यात पोहोचलेला नाही. दिल्लीचे सर्व खेळाडू मुंबईत क्वारंटाइन आहेत. त्यामुळे आता पंजाब किंग्सच्या संघाला पुण्यावरुन सामना खेळण्यासाठी मुंबईत बोलावले जाऊ शकते. दिल्ली कॅपिटल्स संघतील ऑलराऊंडर मिचेल मार्श कोरोनाग्रस्त आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याशिवाय संघाशी संबंधित आणखी तीन जण कोविड पॉझिटिव्ह आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन, कॅप्टन ऋषभ पंतसह सर्वच खेळाडू क्वारंटाइन आहेत. त्या सगळ्यांची पुन्हा एकदा RT-PCR टेस्ट होईल. जे खेळाडू निगेटिव्ह असतील, ते पंजाब किंग्स विरुद्ध सामना खेळतील.
बायो बबलमधील काही जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी दिली होती. कोविड पॉझिटिव्ह असले, तरी त्यांच्यात आजाराची कुठलीही लक्षणे नाहीयत. त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवलं जातय. दिल्लीचे खेळाडू वेगवेगळ्या रुम्समध्ये रहात आहेत. त्यांची नियमित तपासणी केली जात आहे.
मागच्या सीजनमध्येही कोरोनाची एखाद-दुसरी प्रकरण समोर आली होती. पण त्यानंतर काही संघातील खेळाडूंचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. 29 सामने झाल्यानंतर लीग स्थगित करावी लागली होती. त्यानंतर स्पर्धेचा दुसरा टप्पा यूएईमध्ये आयोजित करण्यात आला. दिल्ली कॅपिटल्सने या सीजनमध्ये पाच पैकी दोन सामने जिंकलेत. तीन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. पंजाब किंग्सची सुरुवात चांगली झाली. पण सहा पैकी तीन सामने त्यांनी जिंकले, तीन मॅचमध्ये पराभव झाला.