मुंबई: भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी BCCI च्या विद्यमान निवड समितीचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या दोन क्रिकेटपटूचा श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विचार करण्यात आलेला नाही. म्हणून दिलीप वेंगसरकरांनी संताप व्यक्त केला. काल श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan sharma) यांनी काल 18 सदस्यीय संघ जाहीर केला. पण त्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड आणि मुंबईच्या सर्फराज खानचं नाव नव्हतं. वेंगसरकरांच्या मते संघ निवडताना सिलेक्टर्सनी डोक्याचा वापर केला नाही. सिलेक्टर्सच्या अशा पद्धतीच्या संघ निवडीमुळे दोन युवा खेळाडूंच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ शकतो, असे वेंगसरकरांनी म्हटले आहे.
निवड समिती खच्चीकरण करतेय
“संघ निवडताना सिलेक्टर्सनी डोकं वापरल्याचं दिसत नाही. ऋतुराज आणि सर्फराजला वगळण्यावर तुमच्याकडे काय स्पष्टीकरण आहे?. स्थानिक क्रिकेटमध्ये दोघांनी खोऱ्याने धावा केल्या आहेत. संघाकडे पाहिल्यानंतर काही खेळाडू प्रतिभावान दिसतात. पण त्यांनी संघात स्थान मिळवण्यासाठी विशेष काही केलेलं नाही. ऋतुराज आणि सर्फराज दोघे संघात स्थान मिळवण्यासाठी पात्र होते. भारतीय संघात त्यांची निवड न करुन निवड समिती त्यांचे खच्चीकरण करत आहे” अशा शब्दात दिलीप वेंगसकरांनी निवड समितीचा समाचार घेतला.
मुंबईच्या खेळाडूची 275 धावांची खेळी
सर्फराजने 2019-20 च्या रणजी सीजनमध्ये सहा सामन्यात 154.66 च्या सरासरीने 952 धावा केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या मुंबई विरुद्ध सौराष्ट्र सामन्यात त्याने पहिल्या डावात 275 धावांची खेळी केली. दुसऱ्याबाजूला ऋतुराज गायकवाड दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून भारतीय संघासोबत आहे. पण अजून त्याला संधी मिळालेली नाही. त्याने आयपीएलच्या मागच्या सीजनमध्ये आणि स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत.
चार मार्चपासून श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. पहिला सामना मोहाली येथे तर दुसरा डे-नाईट कसोटी सामना बंगळुरुला होणार आहे. 12 मार्चपासून दुसरी कसोटी सुरु होईल. त्याआधी 24 फेब्रुवारीपासून श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 सीरीज होणार आहे.
Dilip Vengsarkar slam Selectors for not selectin ruturaj gaikwad & Sarfarz khan