मुंबई: स्वप्न पूर्ण होतात….. टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळाल्यानंतर दिनेश कार्तिकचं हे टि्वट होतं. दिनेश कार्तिकने ट्विटरवर फॅन्ससमोर आपला आनंद व्यक्त केला. आयपीएल 2022 आधी दिनेश कार्तिक टीम इंडियाच्या वर्ल्ड कप टीमचा भाग असेल, याचा कोणी विचारही केला नव्हता.
आयपीएल 2022 मध्ये त्याने दमदार प्रदर्शन केलं. त्यानंतर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले. आता तो वर्ल्ड कप टीमचा भाग आहे. पण खरा प्रश्न हा आहे की, टीम इंडियाचा दिनेश कार्तिकवर विश्वास आहे का? दिनेश कार्तिकला टी 20 वर्ल्ड कप दरम्यान प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल का?
दिनेश कार्तिकची विकेटकीपर फलंदाज म्हणून संघात निवड झालीय. त्याचा थेट सामना ऋषभ पंतशी आहे. दिनेश कार्तिकला पंतच्या जागी प्राधान्य मिळेल का? हा खरा प्रश्न आहे. पाकिस्तान विरुद्ध पहिल्या सामन्यात कार्तिकला संधी मिळाली होती. त्यावेळी पंत बेंचवर बसला होता.
कार्तिकला त्या मॅचमध्ये फक्त एक चेंडू खेळण्याची संधी मिळाली. तो एक रन्स काढून नाबाद राहिला. भारताने पाकिस्तान विरुद्ध तो सामना जिंकला. त्यानंतर टीम मॅनेजमेंटने दिनेश कार्तिकला बेंचवर बसवलं. श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध त्याला संधी मिळाली नाही. अफगाणिस्तान विरुद्ध शेवटच्या सामन्यात त्याला संधी मिळाली.
हाँगकाँग विरुद्ध पंतला फलंदाजीची संधी मिळाली नाही. श्रीलंकेविरुद्ध त्याने फक्त 17 आणि पाकिस्तान विरुद्ध 14 धावा केल्या. अफगाणिस्तान विरुद्ध 20 धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या बाजूला दिनेश कार्तिकला संपूर्ण टुर्नामेंटमध्ये फक्त 1 चेंडू खेळण्याची संधी मिळाली.
आकड्यांवरुन टीम इंडिया पंतला संधी देणार की, दिनेश कार्तिकला बाहेर बसवणार? हा प्रश्न निर्माण होतो. दोन्ही खेळाडूंच टीममध्ये एकत्र खेळणं शक्य नाहीय. असं झाल्यास टीम इंडियाला पाच गोलंदाजांसह मैदानात उतराव लागेल.