मुंबई: विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) तीन वर्षानंतर टीम इंडियात पुनरागमन केलं आहे. संघात परतल्यानंतर तो फक्त दोन सीरीजमध्ये खेळलाय. पण आता तो टीम इंडियाच कर्णधारपद भुषवणार आहे. डर्बीशर आणि नॉर्थमप्टनशर विरुद्धच्या दोन सराव सामन्यांसाठी (Warmup Match) दिनेश कार्तिकला कॅप्टन बनवण्यात आलं आहे. डर्बीशर विरुद्ध भारतीय टीम शुक्रवारी रात्री 11.30 वाजता पहिली वॉर्मअप मॅच खेळणार आहे. आयर्लंड विरुद्धच्या सीरीजमध्ये हार्दिक पंड्या (Hardik pandya) टीमचा कॅप्टन होता. भारताने ही टी 20 मालिका 2-0 ने जिंकली. इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरीजआधी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. या सराव सामन्यात दिनेश कार्तिक संघाचे नेतृत्व करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक पंड्याला आराम देण्यात येईल.
2022 मध्ये भारतीय संघाने अनेक नवीन कॅप्टन बघितलेत. विराट कोहलीनंतर रोहित शर्मा तिन्ही फॉर्मेटमध्ये कॅप्टन झाला. त्याच्या दुखापतीमुळे केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये नेतृत्व केलं. ऋषभ पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजमध्ये कर्णधारपद भूषवलं. हार्दिक पंड्या आयर्लंड विरुद्धच्या सीरीजमध्ये कॅप्टन होता. जसप्रीत बुमराह एजबॅस्टन कसोटीत कर्णधारपद भूषवतोय. आता दिनेश कार्तिक सराव सामन्यात कर्णधार आहे.
दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतून संघात पुनरागमन केलं. वर्ल्ड कप 2019 च्या सेमी फायनलमध्ये तो अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर तीन वर्ष कार्तिक संघाबाहेर होता. आयपीएल 2022 मधील कमालीच्या प्रदर्शनाच्या बळावर दिनेश कार्तिकने संघात पुनरागमन केलय. कार्तिकने फिनिशर म्हणून आपलं काम चोख बजावलं. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये त्याच्याकडे फिनिशर म्हणून पाहिलं जात आहे.
एजबॅस्टन कसोटीनंतर भारतीय संघ तीन वनडे आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे. टी 20 सामन्यांची सीरीज 7 जुलैपासून सुरु होणार आहे. पहिला वनडे सामना 12 जुलैला, दुसरी वनडे 14 जुलैला आणि तिसरी वनडे 17 जुलैला खेळली जाणार आहे.