IPL 2021 मध्ये निराशाजनक कामगिरी, इशान किशन-सूर्यकुमारचं T-20 वर्ल्डकप संघातील स्थान धोक्यात?

| Updated on: Sep 27, 2021 | 4:43 PM

मुंबईची मधळी फळी यंदाच्या आयपीएलमध्ये संघाची डोकेदुखी ठरली आहे. गेल्या वर्षी मुंबईला चॅम्पियन बनवण्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यादवचं मोठं योगदान होतं, मात्र हे दोन खेळाडू यंदा फॉर्मशी झगडताना दिसत आहेत.

IPL 2021 मध्ये निराशाजनक कामगिरी, इशान किशन-सूर्यकुमारचं T-20 वर्ल्डकप संघातील स्थान धोक्यात?
Follow us on

मुंबई : सुपर संडेचा दुसरा डबल हेडर सामना आरसीबी आणि मुंबई इंडियन्स (RCB vs MI) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चांगली सुरुवात केल्यानंतरही इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि कृणाल पंड्यासारखे फलंदाज क्रीजवर टिकू शकले नाहीत. नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि विराट कोहलीच्या आरसीबीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. परिणामी, प्रथम फलंदाजी करताना बँगलोरने 6 विकेट गमावून 164 धावा उभारल्या. प्रत्युत्तरादाखल रोहित शर्माच्या संघाने चांगली सुरुवात केली. परंतु, मधल्या फळीतील सर्व फलंदाज फ्लॉप ठरले आणि येथून सामना मुंबईच्या हातातून निसटला. RCB हा सामना 54 धावांनी जिंकण्यात यशस्वी झाला. (Disappointing performance in IPL 2021, Ishan Kishan-Suryakumar’s place in T-20 World Cup squad in danger?)

मुंबईची मधळी फळी यंदाच्या आयपीएलमध्ये संघाची डोकेदुखी ठरली आहे. गेल्या वर्षी मुंबईला चॅम्पियन बनवण्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यादवचं मोठं योगदान होतं, मात्र हे दोन खेळाडू यंदा फॉर्मशी झगडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडूंना आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. तसेच कृणाल पंड्या गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे इशान आणि सूर्यकुमार या दोघांना आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात स्थान न देता इतर खेळाडू, जे स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहेत, त्यांना संधी द्यावी, अशी मागणी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

इशान किशनकडून निराशा

IPL 2021 मध्ये इशान किशनला मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये संधी दिली आहे. यामधील 8 डावांमध्ये फलंदाजी करताना इशान किशनने अवघ्या 13.37 च्या सरासरीने 107 धावा जमवल्या आहेत. या 8 सामन्यांमध्ये त्याने केवळ 5 चौकार आणि 3 षटकार ठोकले आहेत. हाच इशान किशन आयपीएल 2020 मध्ये मुंबईकडून सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज होता. आयपीएल 2020 मध्ये इशानने 14 सामन्यांमध्ये 145 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 516 धावा चोपल्या होत्या. यात 30 षटकार आणि 36 चौकारांचा समावेश होता. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम त्याने केला होता. इशान किशनचा फॉर्म सध्या मुंबई इंडियन्सची मोठी चिंता आहे.

सूर्यकुमार यादवची बॅट शांत

आयपीएल 2020 मध्ये सूर्यकुमार यादव मुंबईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याने 16 सामन्यांमध्ये 145 च्या स्ट्राईक रेटने 4 अर्धशतकांच्या मदतीने 480 धावा चोपल्या होत्या. त्यात 64 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता. त्याच सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सपशेल निराशा केली आहे. मुंबईकडून तो यंदा 10 सामने खेळला आहे. त्यात त्याने केवळ 189 धावा जमवल्या आहेत.

किशन आणि सूर्यकुमार यादव अपयशी ठरत असल्याने भारतीय संघात इतर खेळाडूंना संधी द्यावी, अशी मागणी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. श्रेयस अय्यर, संजू सॅमसन आणि मयंक अग्रवालने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे निवड समितीने या खेळाडूंचा विचार करावा, असे क्रिकेटरसिकांना वाटते. इशान किशन आणि सूर्यकुमार यादवचा फॉर्म भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यासाठी डोकेदुखी ठरु शकतो.

इतर बातम्या

IPL 2021 : 4 संघ, 8 गुण आणि 1 स्थान… कोणता संघ मारणार बाजी, कोणाला मिळणार प्लेऑफचं तिकीट? वाचा सविस्तर एका क्लिकवर

IPL 2021: आधी विराटचं-मॅक्सवेलचं अर्धशतकं, मग हर्षल पटेलच्या भेदक माऱ्यासमोर मुंबई गारद, 54 धावांनी दारुण पराभव

(Disappointing performance in IPL 2021, Ishan Kishan-Suryakumar’s place in T-20 World Cup squad in danger?)