टी-ट्वेन्टी वर्ल्ड कप सुरु असताना यावेळी अनेक सामन्यांदरम्यान पाऊस पडला. त्यामुळे अनेक सामने रद्द झाले. तर अनेक सामन्यांना त्याचा फटका बसला. पण पाऊस पडल्यानंतर ज्या सामन्यांचा निकाल समोर आला त्यासाठी डकवर्थ लुईस नियम वापरण्यात आला. या नियमाच्या आधारे पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यांचे निकाल समोर आले. याच नियमाशी संबंधित एक वाईट बातमी समोर आली आहे. क्रिकेट विश्वातील डकवर्थ लुईस नियमाच्या सह-निर्माता फ्रैंक डकवर्थ यांचं निधन झालं आहे. या वृत्तामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. फ्रैंक डकवर्थ 84 वर्षांचे होते.
फ्रैंक डकवर्थ यांचं 21 जूनला निधन झालं. डकवर्थ-लुईस नियम हा फ्रैंक डकवर्थ आणि त्यांचे सहकारी टोनी लुईस यांनी विकसित केला होता. या नियमाचा उपयोग हा पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी होतो. टोनी लुईस यांचं 2020 मध्ये वयाच्या 78 व्या वर्षी निधन झालं होतं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डकवर्थ-लुईस नियमाचा उपयोग हा 1997 मध्ये सर्वात पहिल्यांदा करण्यात आला होता. यानंतर 2001 मध्ये आयसीसीद्वारे कमी ओव्हरच्या सामन्यांमध्ये टार्गेट निश्चित करण्यासाठी एक औपचारिक पद्धतीने हा नियम वापरण्यात आला होता. विशेष म्हणजे डकवर्थ-लुईस या नियमाचा उपयोग आजच्या सामन्यातदेखील करण्यात आला. अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात हा सामना झाला. या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय झाला आणि या संघाला थेट सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळाली.