मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ इंग्लंड दौऱ्यावर (India England Tour) असलेल्या खेळाडूंवर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. इंग्लंड दौऱ्यावर खेळाडू बिनधास्तपणे फिरतायत. चाहत्यांसोबत फोटो काढत आहेत. बोर्डाने आणि वैद्यकीय टीमने दिलेला सल्ला या खेळाडूंनी धुडकावल्याचं दिसत आहे. हे बीसीसीआयच्या (BCCI) नाराजीमागचं खरं कारण आहे. भारताचा कॅप्टन रोहित शर्माला कोरोनाची बाधा (Rohit Sharma Covid Positive) झाली आहे. इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याबद्दल साशंकता आहे. “संघाकडून हे खूप बेजबाबदारपणाच वर्तन आहे. त्यांना काय धोके आहेत, त्याची कल्पना दिली होती. सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय लोकांमध्ये मिसळू नका, हे त्यांना सांगण्यात आलं होतं. पण आपण पाहतोय, रोहित, विराट, ऋषभ आणि जवळपास प्रत्येकानेच या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे. आता रोहितचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आलाय” असं बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टशी बोलताना सांगितलं.
मागच्या आठवड्यात जेव्हा रोहित शर्मा, विराट कोहली शॉपिंगसाठी बाहेर पडले. त्यावेळी चाहत्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढले होते. तेव्हासुद्धा, मास्कशिवाय फिरत असल्याबद्दल बीसीसीआयने चिंता व्यक्त केली होती. लीसेस्टरशायर विरुद्धच्या सराव सामन्याच्या तिसऱ्यादिवशी रोहित शर्माची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. नियमानुसार, रोहितला लीसेस्टरशायर येथील हॉटेलमध्ये पाच दिवस आयसोलेशन मध्ये रहावं लागणार आहे. 30 जूनला सहाव्यादिवशी त्याची आरटी पीसीआर टेस्ट निगेटिव्ह येणं आवश्यक आहे, तरच त्याला इंग्लंड विरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात खेळता येईल.
अन्यथा त्याच्याजागी भारताला दुसऱ्या कर्णधाराची निवडही करावी लागेल. पाचवा कसोटी सामना मागच्यावर्षी 10 ते 14 सप्टेंबर दरम्यान होणार होता. पण भारतीय गोटात कोविडची लागण झाल्याने विराट आणि रोहित दोघांनी हा सामना खेळायला नकार दिला. तोच पाचवा कसोटी सामना येत्या 1 जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळला जाणार आहे. भारत या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. कसोटी सामन्यानंतर तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे.