मुंबई: टीम इंडियाच्या गोटात कोरोनाने (Corona) एंट्री केली आहे. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) स्वत: कोरोना पॉझिटिव्ह आहे. अन्य खेळाडूंचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले, तरी धाकधूक मात्र नक्कीच वाढली आहे. रोहितला लीसेस्टरशायर येथील हॉटेलमध्ये पाच दिवस आयसोलेशन मध्ये रहावं लागणार आहे. 30 जूनला सहाव्यादिवशी त्याची आरटी पीसीआर टेस्ट निगेटिव्ह येणं आवश्यक आहे, तरच त्याला इंग्लंड विरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात खेळता येईल. अशा परिस्थितीत पुन्हा रोहितची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर काय? हा प्रश्न आहे. संघ व्यवस्थापनला नवीन कॅप्टनच निवडावा लागणार नाही, तर सलामीच्या जागेचाही प्रश्न निर्माण होईल. म्हणून बीसीसीआयने तातडीच पाऊल उचलताना मयंक अग्रवालची (Mayank Agarwal) कसोटी संघात निवड केली आहे. त्याला तातडीने इंग्लंडला रवाना होण्यास सांगितलं आहे. मयंक अग्रवालला याआधी सुद्धा स्टँड बाय वर ठेवण्यात आलं होतं.
केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर गेल्याने सलामीचा प्रश्न निर्माण झाला होता. बीसीसीआयला केएल राहुलच्या जागी मयंक अग्रवालची निवड करायची होती. पण शुभमन गिल इंग्लंडमध्ये आहे. सलामीवीर म्हणूनच त्याची निवड केली आहे. त्यामुळे शुभमन गिल असताना, तूर्तास मयंक अग्रवालची गरज नाहीय, असं संघ व्यवस्थापनाचं मत होतं. पण आता रोहित शर्माला कोरोना झालाय. त्याच्याच खेळण्याबद्दल अनिश्चितता आहे. त्यामुळे बीसीसीआयने मयंक अग्रवालला तातडीने इंग्लंडला रवाना होण्याची सूचना केली आहे.
मयंक अग्रवालची कसोटी संघात निवड झाली असली, तरी त्याला खेळण्याची संधी मिळेल का? याबद्दल शंका आहे. कारण रोहित फिट ठरला, तर तो आणि शुभमन गिल सलामीला उतरतील. अशावेळी मयंकला बाहेरच बसाव लागेल. पण रोहित वेळेत फिट ठरला नाही, तर मयंक अग्रवालला संधी मिळू शकते. मयंक अग्रवाल विशेष फॉर्ममध्ये नाहीय किंवा त्याला तशी छापही उमटवता आलेली नाही. मागच्या महिन्यात संपलेल्या आयपीएल 2022 मध्ये मयंक पंजाब किंग्सचा कॅप्टन होता. पण त्याला फलंदाज आणि कॅप्टन म्हणून आपली छाप उमटवता आली नाही. त्याआधी सुद्धा कसोटी संघातून खेळताना त्याने विशेष अशी कामगिरी केलेली नाही.