मुंबई: एजबॅस्टन कसोटी सुरु होण्याआधी टीम इंडियाची बाजू थोडी कमकुवत वाटतेय. कारण केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे या सीरीजमध्ये खेळत नाहीय. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खेळण्याबद्दल सुद्धा अजूनही अनिश्चितता आहे. त्यात इंग्लंडने न्यूझीलंडच्या टीमला 3-0 ने धूळ चारली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचं पारड थोडं जड वाटतय. इंग्लंडचा नवीन कर्णधार बेन स्टोक्सने आक्रमक क्रिकेट खेळण्याचा इशारा दिला आहे. पण इंग्लंडच्या या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा विचार, दृष्टीकोन आणि रणनिती पुरेशी आहे. इंग्लंडची टीम सध्या आपला नवीन कॅप्टन आणि कोचच्या मार्गदर्शनाखाली नव्या पद्धतीच आक्रमक क्रिकेट खेळतेय. न्यूझीलंडला मायदेशात त्यांनी ज्या पद्धतीने धूळ चारली, त्यावरुन त्यांची आक्रमक मानसिकता दिसून आली. मालिका संपल्यानंतर भारताविरुद्ध सुद्धा आम्ही अशाच पद्धतीच क्रिकेट खेळू, असं बेन स्टोक्सने म्हटलं आहे. राहुल द्रविड यांनी या सगळ्यावर एवढच म्हटलय, त्यांना आक्रमक क्रिकेट खेळूं दे. आम्ही आमच्या पद्धतीच क्रिकेट खेळू.
भारतासाठी हा कसोटी सामना महत्त्वाचा आहे. कारण 15 वर्षानंतर भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. मागच्यावर्षी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील एक सामना बाकी राहिला होता. आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले गेले असून भारत 2-1 ने आघाडीवर आहे. कोविडमुळे मागच्यावर्षी एक कसोटी रद्द झाली होती. तोचा सामना उद्यापासून सुरु होणार आहे.
इंग्लंडचा संघ बलाढय वाटत असला, तरी टीम इंडियाची काय बलस्थानं आहेत, ते हेड कोच राहुल द्रविड यांनी सांगितलं. “प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास, आमची टीम खूप चांगली आहे. आम्ही सातत्याने सकारात्मक क्रिकेट खेळतोय. मागच्यावर्षी आम्ही WTC टेबल मध्ये दुसऱ्या नंबरवर होतो. आता सुद्धा आम्ही तिसऱ्या नंबरवर आहोत. यातून आमचा संघ किती यशस्वी आहे, ते दिसून येतं. आम्ही 20 विकेट घेण्यास सक्षम आहोत, म्हणून आम्ही यशस्वी आहोत. माझ्यासाठी यापेक्षा अजून काही सकारात्मक असू शकत नाही” असं राहुल द्रविड म्हणाले.