नवी दिल्ली : इंग्लंडच्या जो रुटचा जगातील टॉप 4 फलंदाजांमध्ये समावेश होतो. तो विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ. केन विलियमसनसह फॅब-4 चा भाग आहे. पण इंग्लंडच्या या टॉप खेळाडूसाठी वर्ल्ड कप 2023 वाईट स्वप्नापेक्षा कमी नाहीय. जो रुटने पहिल्या दोन सामन्यात चांगली फलंदाजी केली. पण नंतरच्या 6 सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा आटल्या. जो रुट नेदरलँड्स विरुद्ध दमदार फलंदाजी करेल, अशी इंग्लिश चाहत्यांना अपेक्षा होती. पण असं घडलं नाही. जो रुट नेदरलँड्स विरुद्ध 28 धावांवर आऊट झाला.
क्रिकेटच्या मैदानाता मोठा फलंदाजही लवकर आऊट होतो. पण नेदरलँड्स विरुद्ध जो रुट ज्या पद्धतीने आऊट झाला, ते पाहून सगळेच हैराण झाले. जो रुट बोल्ड झाला. त्याने आपला विकेट गोलंदाजाला भेट म्हणून दिला.
कसा OUT झाला रुट?
जो रूट क्रीजवर सेट झाला होता. तो 28 धावांवर फलंदाजी करत होता. टीमचा रनरेटही चांगला होता. पण रुटला अचानक रिव्हर्स स्कूपचा फटका खेळण्याचा मोह झाला. त्याने वॅन बीकच्या गोलंदाजीवर हा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी रुटसोबत जे घडलं, त्यामुळे इंग्लंडचे चाहतेही चक्रावून गेले. रुटने बीकच्या चेंडूवर रिव्हर्स स्कूप मारण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी चेंडू त्याच्या दोन पायांमधून गेला. रुटचा थेड मिडिल स्टम्प उडाला. रुट ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलच्या स्टाइलमध्ये हा शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता. पण तो अपयशी ठरला. रुट रिव्हर्स स्कूपचा फटका खूप चांगला खेळतो. पण काहीवेळा तुमची ताकतच तुमची कमजोरी बनते. जो रुटच्या बाबतीत हेच झालं.
वर्ल्ड कपमध्ये रुटची कामगिरी कशी?
वर्ल्ड कपमध्ये जो रुटची कामगिरी खूपच खराब आहे. 8 सामन्यात 27 च्या सरासरीने त्याने आतापर्यंत फक्त 216 धावा केल्या आहेत. रुटच्या खराब कामगिरीचा परिणाम इंग्लंडच्या टीमवरही पडला. त्यांनी 7 पैकी 6 सामने गमावले आहेत. मागच्यावेळी वर्ल्ड कप जिंकणारी इंग्लंडची टीम सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर गेलीय. या वर्ल्ड कपनंतर रुट वनडे टीममधून बाहेर जाऊ शकतो.