मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये पहिला वनडे सामना ओव्हलवर होणार आहे. टी 20 सीरीज मधील विजयाने टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. दुसऱ्याबाजूला यजमान इंग्लंडचा संघ टी 20 सीरीज (T 20 Series) मधील पराभवाचा हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. इंग्लंड यावेळी मजबूत संघ मैदानात उतरवणार आहे. त्यामुळे पहिल्या वनडे (ODI) मध्ये विजय मिळवणं, टीम इंडियासाठी टी 20 इतकं सोपं नसेल. इंग्लंडचे अनेक सीनियर खेळाडू मैदानावर उतरतील. यात जॉनी बेयरस्टो, ज्यो रुट आणि बेन स्टोक्स यांचा समावेश आहे. जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोनही या टीम मध्ये आहेत. इंग्लंड ओव्हलच्या मैदानावर कुठल्या प्लेइंग 11 सह उतरेल, ते जाणून घेऊया.
इंग्लंड जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो यांची जोडी सलामीला उतरवेल. रॉय फॉर्म मध्ये नाहीय. पण बेयरस्टोच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. एजबॅस्टन कसोटीत दोन्ही डावात शतक ठोकून जॉनी बेयसस्टोने भारताकडून विजयाची संधी हिरावून घेतली होती. वनडे, टी 20 मध्ये बेयरस्टो बिनधास्त फलंदाजी करतो.
ज्यो रुट, बेन स्टोक्स, जोस बटलर आणि लियाम लिव्हिंगस्टोन इंग्लंडच्या मधल्याफळीचा आधारस्तंभ आहेत. 2019 वर्ल्ड कप नंतर पहिल्यांदा असं होणार आहे, जेव्हा इंग्लंडकडून रुट, बटलर आणि स्टोक्स एकत्र मैदानावर दिसतील. रुट आणि स्टोक्स कमालीचे फॉर्म मध्ये आहेत. जोस बटलरने आयपीएल 2022 चा सीजन गाजवला होता. लियाम लिव्हिंगस्टोन आपल्या फटकेबाजीने कुठल्याही गोलंदाजाची लय बिघडवू शकतो.
मोइन अली सारखा फलंदाज सातव्या क्रमांकावर येतो, त्यावरुन इंग्लंडचा संघ किती भक्कम आहे, ते दिसून येते. सॅम करण, डेविड विली यांच्यावर वेगवान गोलंदाजीची भिस्त आहे.
जोस बटलर (कॅप्टन), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, ज्यो रुट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोइन अली, सॅम करण, डेविड विली, रीस टॉप्ली आणि मॅट पार्किन्सन