मुंबई : आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकणारा दिग्गज खेळाडू ऑनलाइन सट्टेबाजीच्या जाहिरातींमध्ये दिसल्यामुळे अडचणीत आला आहे. इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम ( Brendon Mccullum) यांचं प्रशिक्षक पद धोक्यात आलं आहे. कारण इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केले आहे की नाही याची चौकशी सुरु केली असल्याचं म्हटलं जात आहे. न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराला जानेवारीमध्ये सट्टेबाजीच्या जाहिरातीत ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले होते आणि त्यानंतर तो ऑनलाइन जाहिरातींमध्ये दिसला होता.
27 मार्च रोजी त्याने फेसबुक पेजवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये सट्टेबाजी कंपनीचा प्रचार करत आहे. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, ईसीबीने सांगितले की, ‘आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. ब्रेंडनशी सट्टेबाजी कंपनीशी असलेल्या त्यांच्या संबंधांवर चर्चा करत आहे. आमच्याकडे सट्टेबाजीबाबत नियम आहेत आणि आम्ही नेहमी खात्री करतो की ते पूर्णपणे पाळले जावेत.
ईसीबीने मात्र मॅक्क्युलमची सध्या कोणतीही चौकशी नसल्याचे स्पष्ट केले. न्यूझीलंडच्या प्रॉब्लेम गॅम्बलिंग फाउंडेशनने गेल्या आठवड्यात या जाहिरातींबद्दल ECB कडे तक्रार केली. मॅक्युलमने प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून इंग्लंडने गेल्या 12 पैकी 10 कसोटी सामने जिंकले आहेत.
न्यूझीलंडचा माजी कर्णधार गेल्या मोसमापर्यंत दोन वेळा आयपीएल विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सचा प्रशिक्षक होता. तो या संघाकडूनही खेळला आहे. या मोसमापूर्वी त्याने संघातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड कसोटी संघाचा प्रशिक्षक झाल्यापासून बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली संघाने चांगलं यश मिळवलं आहे.