लंडन : Ashes Series चा पहिला कसोटी सामना रंगतदार बनला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीम्सना विजयाची समान संधी आहे. मॅच खूपच हायवोल्टेज झाली आहे. एकवेळ असं वाटलं की, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या बेजबॉलची हवा काढली. पण दिवसाचा खेळ संपता-संपता इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणलं. आज कसोटीचा शेवटचा पाचवा दिवस आहे.
इंग्लिश गोलंदाज आक्रमक मूडमध्ये आहेत. त्यामुळे पहिल्या कसोटीचा शेवटचा दिवस ऑस्ट्रेलियासाठी सोपा नसेल. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सने बेजबॉल क्रिकेटला प्राधान्य दिलं. इंग्लंडने त्यांचा पहिला डाव 8 बाद 393 धावांवर घोषित केला.
कमिन्सने स्टोक्सच्या रणनितीवर पाणी फिरवलं
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 386 धावांवर आटोपला. इंग्लंडला नाममात्र फक्त 7 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्याडावात वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर दबाव वाढवला होता. पॅट कमिन्सने स्टोक्सच्या सर्व रणनितीवर पाणी फिरवलं. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव 273 धावांवर आटोपला. इंग्लंडचे फलंदाज फ्लॉप झाल्यामुळे स्टोक्सचा निर्णय चुकीचा ठरतोय असं वाटलं. पण ओली रॉबिनसन आणि स्टुअर्ट ब्रॉडने तिसऱ्या सेशनमध्ये खेळच पालटला.
ऑस्ट्रेलियाला तीन झटके
रॉबिनसनने डेविड वॉर्नरच्या रुपात दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट काढली. वॉर्नर 36 रन्सवर बाद झाला. त्यानंतर ब्रॉडने मार्नस लाबुशेनला 13 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. दिवसाचा खेळ संपायला काही मिनिट बाकी असताना, ऑस्ट्रेलियाला स्टीव स्मिथच्या रुपात तिसरा धक्का बसला. स्मिथने अवघ्या 6 धावा केल्या. विकेटपाठी बेयरस्टोने तिन्ही फलंदाजांना कॅचआऊट केलं. उस्मान ख्वाजा 34 आणि स्कॉट बोलँड 13 धावांवर खेळतोय.
The Test is in the balance after Stuart Broad’s brilliant spell late in the day ?#Ashes | #WTC25 | ?: https://t.co/ZNnKIn9R3Y pic.twitter.com/l84R7vSnAz
— ICC (@ICC) June 19, 2023
इंग्लंडकडून कोणी धावा केल्या?
इंग्लंडने चौथ्यादिवशी 2 बाद 28 धावांवरुन पुढे खेळायला सुरुवात केली. ओली पोप आऊट झाल्यानंतर जो रूट (46), हॅरी ब्रूक (46) आणि कॅप्टन स्टोक्सने (43) डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तिघांपैकी कोणी मोठी खेळी करु शकला नाही. इंग्लंडचा दुसरा डाव 273 धावांवर आटोपला.
आज पाचव्यादिवशी स्थिती काय?
चौथ्यादिवशी इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 281 धावांच टार्गेट ठेवलं. दिवसाचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमावून 107 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 174 धावांची गरज आहे. तेच इंग्लंडला 7 विकेट हव्या आहेत.