लंडन : Ashes मालिकेतील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील पहिला कसोटी सामना खूपच रंगतदार ठरला. अपेक्षेप्रमाणे अखेरपर्यंत क्रिकेटप्रेमींची उत्सुक्ता ताणली गेली होती. या कसोटीच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. कधी पारडं ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, तर कधी इंग्लंडच्या बाजूने झुकत होतं. अखेर पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्सने पहिल्या कसोटी सामन्यात काही धाडसी निर्णय घेतले.
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने या कसोटीत इंग्लंडच्या बेजबॉल क्रिकेटची चांगलीच हवा काढली. कमिन्सच्या इनिंगच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला.
पॅट कमिन्सची कॅप्टन इनिंग
ऑस्ट्रेलियाने 2 विकेटने पहिली Ashes कसोटी जिंकून सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 281 धावांच लक्ष्य 8 विकेट गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स कॅप्टन इनिंग खेळला. त्याने नाबाद 44 धावा करताना टीमला विजय मिळवून दिला.
दोन्ही डावात काय घडलं?
बेजबॉल क्रिकेटला प्राधान्य देत इंग्लंडने आपला पहिला डाव 8 बाद 393 धावांवर घोषित केला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 386 धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात 7 धावांची नाममात्र आघाडी घेतली. यानंतर ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी भेदक गोलंदाजी केली. त्यांनी इंग्लंडला दुसऱ्या डावात 273 रन्सवर ऑलआऊट केलं. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 281 धावांच टार्गेट होतं.
शेवटच्या दिवशी काय स्थिती होती?
ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या इनिंगमध्ये अपेक्षित सुरुवात करता आली नव्हती. चौथ्या दिवशीच त्यांच्या तीन विकेट गेल्या होत्या. पावसामुळे कसोटीच्या शेवटच्या दिवसाचा खेळ उशिराने सुरु झाला. ऑस्ट्रेलियाने मंगळवारी 3 बाद 107 वरुन डाव पुढे सुरु केला. शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 174 धावांची तर इंग्लंडला 7 विकेट आवश्यक होत्या.
पुन्हा तोच ऑस्ट्रेलियाच्या मदतीला आला
उस्मान ख्वाजाने 34 धावा आणि स्कॉट बोलँडने 13 धावांवरुन डाव पुढे सुरु केला. पहिल्या डावात 141 धावा करणाऱ्या ख्वाजाने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्याने 65 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाला स्कॉट बोलँडच्या रुपात पहिला झटका बसला. बोलँड 20 रन्सवर बाद झाला. त्याच्यानंतर ट्रेविस हेड सुद्धा 16 धावांवर आऊट झाला.
What a match, A famous victory for Australia
Well played Pat Cummins?
Who says Test Cricket is boring?#Ashes23 #ENGvsAUS pic.twitter.com/kjdeLrBFMV— Mujahid (@mujahid_bhattii) June 20, 2023
सामना इंग्लंडच्या बाजूने झुकलेला
हेडचा विकेट जाताच इंग्लिश टीमने सामन्यावर पकड मिळवली अस वाटलं. कॅमरुन ग्रीन आणि एलेक्स कॅरीला इंग्लिश गोलंदाजांनी जास्तवेळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. ग्रीन 28 धावांवर आऊट झाला. ख्वाजा एकाबाजूने उभा होता. ग्रीननंतर ख्वाजा पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कॅरी 20 रन्सवर आऊट झाला. 227 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या 8 विकेट गेल्या होत्या. सामना इंग्लंडच्या बाजूने झुकला होता. पण रोमांच अजून टिकून होता.
शेवटच्या 40 मिनिटांचा रोमांच
पहिल्या कसोटीचा खरा रोमांच शेवटच्या 40 मिनिटात दिसला. क्रीजवर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स आणि नाथन लायन होते. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 15 ओव्हर्समध्ये 51 धावांची आवश्यकता होती. यावेळी कमिन्स आक्रमक क्रिकेट खेळला. 8 विकेट गेल्यानंतरही त्याने नाथन लायनसोबत मिळून नाबाद 55 धावांची भागीदारी केली. इंग्लंडच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला.