मुंबई: इंग्लंडने दुसऱ्या टी 20 सामन्यात (AUS vs ENG) ऑस्ट्रेलियाला 8 धावांनी हरवलं. या मालिकेतील अजून एक सामना बाकी आहे. मात्र त्याआधीच इंग्लंडने (England) मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. बुधवारी दोन्ही टीम्समध्ये सामना झाला. इंग्लंडने प्रथम बॅटिंग केली. त्यांनी ऑस्ट्रेलियाला (Australia) विजयासाठी 179 धावांच लक्ष्य दिलं.
ऑस्ट्रेलियन टीमला 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून फक्त 170 धावा करता आल्या. इंग्लंडच्या विजयात डेविड मलान आणि सॅम करन यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या दोघांप्रमाणेच बेन स्टोक्सनेही कमालीच फिल्डिंग कौशल्य दाखवलं.
हवेमधलं कौशल्य पाहून प्रत्येकजण थक्क
डेविड मलानने 49 चेंडूत 82 धावा चोपल्या. सॅम करणने इंग्लंडकडून 25 धावात 3 विकेट घेतल्या. बेन स्टोक्सने या मॅचमध्ये जबरदस्त फिल्डिंग कौशल्य दाखवलं.
त्याने एक षटकार वाचवून इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. स्टोक्सच हवेमधलं कौशल्य पाहून प्रत्येकजण थक्क आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय.
असा वाचवला षटकार
12 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शने सॅम करणच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळला. या चेंडूवर सीमारेषेपार षटकार जाणार होता. त्याचवेळी स्टोक्सने हवेत झेप घेतली व चेंडूला आता ढकलून सीमारेषेपार जाऊ दिलं नाही. स्टोक्सला हा अवघड झेल पकडता आला नाही. पण त्याने 6 धावा वाचवल्या.
स्टोक्सची बॅट चालली नाही
इंग्लंडने या मॅचमध्ये 7 विकेट गमावून 178 धावा केल्या. मलानने स्फोटक फलंदाजी केली. त्याने 49 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 82 धावा फटकावल्या. त्याच्याशिवाय मोइन अलीने 27 चेंडूत 44 धावा केल्या. बेन स्टोक्सची बॅट चालली नाही. त्याने फक्त 7 धावा केल्या.
Simply outstanding! Ben Stokes saves six with some acrobatics on the rope! #AUSvENG #PlayOfTheDay | #Dettol pic.twitter.com/5vmFRobfif
— cricket.com.au (@cricketcomau) October 12, 2022
ऑस्ट्रेलियाकडून फक्त मार्श चालला
ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉयनिसने 34 धावात 3 विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून मार्शने सर्वाधिक 45 धावा केल्या. त्याने 29 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार लगावले. टिम डेविडने 23 चेंडूत 40 धावा केल्या.