मुंबई: इंग्लंड आणि नेदरलँडमध्ये (England vs Netherlands) तीन वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. एम्स्टलवीन येथे हा सामना सुरु आहे. पहिल्या सामन्यात नेदरलँडने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इंग्लंडच्या संघाची फलंदाजी होती. इंग्लंडने अवघ्या एक रन्सवर जेसन रॉयच्या रुपात पहिला विकेट गमावला होता. मात्र त्यानंतर डेविड मलान (David Malan) आणि फिलिप सॉल्टने (Philip Salut) वेगाने धावा केल्या. दोघांनी द्विशतकीय भागीदारी केली. आधी सॉल्टने नंतर मलानने शतक झळकावलं. डेविड मलानने आपल्या शानदार शतकी खेळी दरम्यान एक जबरदस्त षटकार खेचला. त्यानंतर इंटरनॅशनल सामन्यात मोठा ड्रामा पहायला मिळाला.
डेविड मलानने इतका लांबलचक षटकार मारला की, बॉलच हरवला. नेदरलँडसचे खेळाडू बोल शोधण्यासाठी चक्क झुडूपात घुसले होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 8 व्या षटकात हा प्रकार घडला. पीटरच्या गोलंदाजीवर मलानने लाँग ऑफवरुन षटकार खेचला. हा बॉल झुडूपांमध्ये गुडूप झाला. हा बॉल शोधण्यासाठी ग्राऊंड स्टाफ आणि खेळाडूंचा बरीच मेहनत करावी लागली. पण बॉल झुडूपात हरवला होता. मलानने 90 चेंडूत वनडे मधील पहिलं शतक झळकावलं. मलानने शतकी खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार खेचले.
Drama in Amstelveen as the ball ends up in the trees ? pic.twitter.com/MM7stEMHEJ
— Henry Moeran (@henrymoeranBBC) June 17, 2022
सीरीज सुरु होण्याआधी इंग्लंडचा कॅप्टन इयन मॉर्गनने हा दौरा आगामी सीजनआधी लाँचिंग पॅड असल्याचं म्हटलं होतं. इंग्लंडचा संघ द्विपक्षीय सीरीज आणि टी 20 वर्ल्ड कप खेळणार आहे. योग्य खेळाडूंनी योग्य भूमिका पार पडण्याची ही वेळ आहे, असं इंग्लिश कॅप्टनने म्हटलं होतं. वर्ल्ड कप तयारीच्या दृष्टीने जुलै महिना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असं मॉर्गन म्हणाला होता. जुलै मध्ये इंग्लंडला भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन मजबूत संघांविरुद्ध खेळायचं आहे.