दोहा: सध्या कतार येथे फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2022 स्पर्धा सुरु आहे. हा वर्ल्ड कप पाहण्यासाठी जगभरातून फुटबॉल रसिक कतारमध्ये दाखल झाले आहेत. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये यजमान देश आपल्या संस्कृतीच दर्शन घडवतोच. पण स्पर्धा पाहण्यासाठी आलेले विविध देशांचे प्रेक्षकही आपल्या कृतीमधून आपल्या देशाची संस्कृती दाखवत असतात. कतारमधील फुटबॉल वर्ल्ड कपच्या निमित्ताने जपानने जगासमोर एक आदर्श उदहारण ठेवलय.
चार वर्षानंतर पुन्हा तीच कृती
चार वर्षांपूर्वी फिफा वर्ल्ड कप 2018 मध्ये बेल्जियम विरुद्ध राऊंड ऑफ 16 मध्ये जपानचा पराभव झाला. या पराभवानंतर चाहत्यांच निराश होणं स्वाभाविक आहे. पण त्या परिस्थितीतही जपानी चाहत्यांनी स्टेडियमधील कचरा उचलला होता. आता कतार येथे सुरु असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतही जपानने स्वच्छतेला प्राधान्य दिलय.
संपूर्ण जगभरातून कौतुक
2022 फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत कतार आणि इक्वाडोरमध्ये सलामीचा सामना झाला. त्यानंतर जपानी चाहत्यांनी अल बायत स्टेडियमवर अन्य प्रेक्षकांनी केलेला सर्व कचरा उचलला. जपानी फॅन्सच्या या कृतीच संपूर्ण जगभरातून कौतुक होतय.
जपानी फॅन्सच्या या आचरणाने स्थानिकही आश्चर्यचकीत झाले. कारण पहिल्या दिवशी जपानचा एकही सामना नव्हता. जपानी चाहत्यांनी स्टेडियमच्या प्रत्येक रांगेत जाऊन प्लास्टिकच्या बॉटल्स, पेपर कप आणि अन्नाची पाकिट उचलली. बहरीनचा इन्फल्यून्सर ओमर अल फारुखने त्याच्या मोबाइलमध्ये हे सर्व शूट करुन इन्स्टाग्रामवर शेयर केलं.
तुम्ही हे सर्व का करताय?
तुम्ही हे सर्व का करताय? असं विचारल्यानंतर जपानी चाहत्याने सांगितलं की, “आम्ही जापनीस आहोत. आम्ही कचरा मागे ठेवत नाही. आम्ही जागेचा आदर करतो”