मुंबई: एका युवा भारतीय क्रिकेटपटूवर एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋदिमान साहा (Wriddhiman Saha) बंगाल टीमची साथ सोडून त्रिपुराला निघून गेला. त्याच्याच प्रमाणे एक युवा क्रिकेटपटू आपल्या संघाची साथ सोडून नव्या संधीच्या शोधात होता. त्यालाही त्रिपुराकडून खेळायचे होते. पण यामध्ये तो खूप वाईट पद्धतीने फसला. या युवा खेळाडू विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्रिपुराच्या अंडर 19 टीमकडून (Tripura under 19 team) खेळण्यासाठी बनावट कागदपत्र बनवणाऱ्या या क्रिकेटपटू विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली.
पश्चिम बंगालच्या बैरकपुर येथे रहाणाऱ्या युवा क्रिकेटपटूने त्रिपुराकडून खेळण्यासाठी कथितरित्या त्रिपुराचा स्थानीय निवास असल्याचं प्रमाणपत्र आणि रेशन कार्ड सारखी खोटी कागदपत्र बनवली. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. बिशालगढ क्रिकेट संघाने अंडर 19 ट्रायलसाठी या युवा क्रिकेटपटूच्या नावाची शिफारस त्रिपुरा क्रिकेट संघटनेकडे केली होती. त्रिपुराने 11 जुलैला अंडर 19 टीमची घोषणा केली. त्यात त्याचं नाव होतं. काल रात्री असोशिएशचे प्रभारी सचिव किशोर दास यांनी या खेळाडू विरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला. त्या आधारावर गुन्हा नोंदवण्यात आला. रिपोर्ट्स नुसार हा खेळाडू आधी पायकपारा स्पोर्टिंग क्लबसाठी खेळायचा. पोलीस आता या क्रिकेटपटूला खोटी कागदपत्र बनवून देण्यासाठी मदत करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.
मागच्या काही काळापासून अनेक खेळाडू त्रिपुराची वाट धरतायत. साहा सुद्धा 2022-2023 च्या सीजन मध्ये त्रिपुराच्या सीनियर संघाकडून खेळताना दिसेल. तो मेंटॉरच्या भूमिकेत असेल. त्याला कॅप्टन बनवलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे. भारतीय विकेटकीपर फलंदाज साहाची बऱ्याच काळापासून त्रिपुरा क्रिकेट संघटनेबरोबर चर्चा सुरु होती. बंगाल क्रिकेट संघटनेकडून एनओसी मिळाल्यानंतरच त्याने पुढे प्रक्रिया सुरु केली.