Virat kohli: ‘त्या’ दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने थोपटली विराटची पाठ, सहजासहजी त्यांच्या तोंडून कौतुकाचे शब्द निघत नाहीत

| Updated on: Jan 30, 2022 | 5:04 PM

विराटचा स्वभाव लक्षात घेता, दोन वेगवेगळी टोकाची मत व्यक्त झालेली पाहायला मिळतात. आता ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार इयन चॅपल (Ian Chappell) यांनी विराट कोहलीचं आपल्या नजरेतून विश्लेषण केलं आहे.

Virat kohli: त्या दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने थोपटली विराटची पाठ, सहजासहजी त्यांच्या तोंडून कौतुकाचे शब्द निघत नाहीत
ALL PHOTOS AFP
Follow us on

सिडनी: विराट कोहली (Virat kohli) भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर त्याच्याबद्दल वेगवेगळी मत व्यक्त होत आहेत. क्रिकेटचे तज्ज्ञ, जाणकार आपआपल्या नजरेतून विराटचं विश्लेषण करत आहेत. काहींच्या मते विराट अजून काही वर्ष कसोटी संघाचं कर्णधारपद (India Test team captain) भुषवू शकला असता, तर काहींनी त्यांच्या ऑल टाइम ग्रेट कर्णधारांच्या यादीत विराटला स्थानही दिलेलं नाही. विराटचा स्वभाव लक्षात घेता, दोन वेगवेगळी टोकाची मत व्यक्त झालेली पाहायला मिळतात. आता ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार इयन चॅपल (Ian Chappell) यांनी विराट कोहलीचं आपल्या नजरेतून विश्लेषण केलं आहे. त्यांनी ESPNcricinfo साठी लिहिलेल्या स्तंभात विराट आणि त्याच्या नेतृत्व गुणांवर कौतुकाचा वर्षाव केलाय. इयन चॅपल यांच्याकडून कौतुकाची थाप मिळवणं इतकं सोप नाहीय. पण आपल्या ‘विराट’ कामगिरीमुळे कोहलीने ती कौतुकाची थाप मिळवली आहे.

कर्णधार म्हणून कोहली अपवाद
दोन आठवड्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने तडकाफडकी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. “विराट कोहली टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून अपवाद आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून खेळताना त्याने कधीही स्वत:च्या उत्साहावर मर्यादा घातल्या नाहीत” असे चॅपल यांनी लिहिलं आहे. “कर्णधार म्हणून कोहली अपवाद आहे, याबद्दल कुठलीही शंका नाही. त्याने त्याच्या उत्साहावर कधीही मर्यादा आणल्या नाहीत. पण संघाचे नेतृत्व करताना भारतीय संघाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याची त्याच्यामध्ये क्षमता होती. उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या सहकार्याने त्याने परदेशात भारताला मालिका विजय मिळवून दिला, जे दुसऱ्या कुठल्याही कर्णधाराला जमलं नाही” असं इयन चॅपल यांनी कोहलीचं कौतुक करताना लिहिलं आहे.

“कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात 2018-19 आणि इंग्लंडमध्ये 2021 मध्ये दोन मोठे विजय मिळवले. मायदेशात तर त्याचा संघ अजिंक्य होता. विराट कोहलीला सौरव गांगुली आणि महेंद्र सिंह धोनीकडून वारसा मिळाला होता, त्याने तो पुढे नेला व सातवर्षात संघाला आणखी पुढे घेऊन गेला” असं चॅपल यांनी ESPNcricinfo च्या कॉलममध्ये लिहिलं आहे. नुकताच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत झालेला पराभव त्याच्यासाठी निराशाजनक ठरला असे चॅपल यांनी म्हटलं आहे.

विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या 68 पैकी 40 कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला. कोहलीचे रेकॉर्डच त्याच्या फलंदाजीबद्दल सर्वकाही सांगून जातात. कर्णधार झाल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्याने सात द्विशतक झळकावली.

Former Australia skipper Ian Chappell praises virat kohli makes BIG statement