लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्य़ा फायनलमध्ये टीम इंडियाची स्थिती खराब आहे. पहिल्या दोन दिवसांच्या खेळावर ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे वर्चस्व गाजवलय. पहिल्या डावात टीम इंडियाची 5 बाद 151 स्थिती आहे. ऑस्ट्रेलियन टीम अजूनही 318 धावांनी पुढे आहे. आपली टीम मजबूत स्थितीमध्ये आहे, हे पाहून रिकी पॉन्टिंगने टीम इंडियाच्या विरुद्ध स्टेटमेंट केलय. रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन आहे. रिकी पॉन्टिंगच हे स्टेटमेंट टीम इंडियाच्या फॅन्सच्या जखमेवर मीठ चोळणारं आहे.
टीम इंडिया आता मॅच जिंकू शकत नाही, असं रिकी पॉन्टिंगने स्पष्टपणे म्हटलय. टीम इंडियाच्या या परिस्थितीला त्यांचे बॉलर जबाबदार आहेत, असं पॉन्टिंगने सांगितलं.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी काय चूक केली?
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पहिल्या दिवसाच्या पहिल्या तासत खराब लेंग्थने गोलंदाजी केली. भारतीय वेगवान गोलंदाजांनी चेंडू पुढे पीच करण्याऐवजी लेंग्थ मागे खेचली. त्यामुळे टीम इंडियाच नुकसान झालं. दुसऱ्याबाजूला ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी नवीन चेंडू पुढे टाकला व भारताची टॉप ऑर्डर कोसळली.
ऑस्ट्रेलियाने आधी शॉर्ट पीच गोलंदाजी केली आणि नंतर…..
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान बॉलर्सनी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये शॉर्ट पीच गोलंदाजी केली. त्यावर शुभमन गिल आणि रोहित शर्माने धावा वसूल केल्या. त्यानंतर त्यांनी चेंडू पुढे टाकले. परिणामी रोहित शर्मा LBW आऊट झाला. शुभमन गिलचा ऑफ स्टम्प उडाला. पुजाराची पण हीच स्थिती झाली.
त्यानंतर मिचेल स्टार्कच्या एक्स्ट्रा बाऊन्स चेंडूवर विराट कोहली आऊट झाला. जाडेजा आणि रहाणने पाचव्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाने 150 धावांचा टप्पा गाठला.