जामनगर : क्रिकेटप्रेमींच्या डिमांडवर षटकार लगावणारा क्रिकेटचा जादूगर, हँडसम क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांचं दिर्घ आजाराने निधन झालं. ते 88 वर्षाचे होते. गेल्या काही वर्षांपासून दुर्रानी हे कॅन्सरने आजारी होते. दीर्घ आजारानंतर आज सकाळी गुजरातच्या जामनगरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीयच नव्हे तर जगभरातील क्रिकेटपटूंमधून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनामुळे क्रिकेटच्या सुवर्णकाळातील महान खेळाडू हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सलीम दुर्रानी हे महान क्रिकेटपटू होते. ते अर्जुन पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते. विशेष म्हणजे अफगाणिस्तानात जन्मलेले हे पहिलेच आणि एकमेव भारतीय क्रिकेटपटू होते. त्यांचा जन्म 1934मध्ये काबूलमध्ये झाला होता. त्यानंतर त्यांचं कुटुंब कराचीत आलं होतं. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात आलं होतं.
1960मध्ये त्यांनी भारताकडून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 29 कसोटी सामने खेळले. 29 कसोटीतील 50 डावांमध्ये त्यांनी 1202 धाव ठोकल्या. तर 75 बळी घेतले. यात त्यांच्या एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. 1962मध्ये त्यांनी इंग्लंडच्या विरोधात पार पडलेल्या चेन्नई कसोटीत 177 धावांवर 10 विकेट काढले होते. त्यांच्या टेस्ट करिअरमधील ही सर्वोत्तम गोलंदाजी होती.
सलीम दुर्रानी हे 8 महिन्यांचे असताना त्यांचं कुटुंब कराचीत आलं होतं. भारत-पाक फाळणीनंतर ते पाकिस्तानातून भारतात आले. आणि इथेच कायमचे स्थायिक झाले. 1960-70च्या दशकात दुर्रानी यांनी आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्समुळे वेगळीच छाप पाडली होती. क्रिकेटच्या इतिहासातील ते सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होते. आक्रमक गोलंदाजीसाठी ते ओळखले जायचे. तसेच क्रिकेटप्रेमींच्या डिमांडवर षटकार लगावण्यातही त्यांचा हातखंडा होता.
सलीम दुर्रानी फेब्रुवारी 1973मध्ये इंग्लंडच्या विरोधात मुंबईत शेवटचा कसोटी सामना खेळले. 1973मध्ये क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर त्यांनी बॉलिवूडकडे मोर्चा वळवला. त्यांनी चरित्र या हिंदी सिनेमातही काम केलं. या सिनेमात त्यांची हिरोईन परवीन बॉबी होती. 2011मध्ये बीसीसीआयने त्यांना सीके नायडू लाईफटाइम अचिव्हमेंट अॅवार्ड देऊन सन्मानित केलं होतं.