IND vs NZ 1st T20 : पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. न्यूझीलंडने टीम इंडियावर 21 धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडने 3 T20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या पराभवाला अर्शदीप सिंहची लास्ट ओव्हरही कारणीभूत ठरली. त्याने या ओव्हरमध्ये 27 धावा दिल्या. अर्शदीपने इतक्या धावा दिल्या नसत्या, तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. कारण या ओव्हरआधी स्थिती भारताच्या नियंत्रणात होती. या मॅचमध्ये पुन्हा एकदा अर्शदीपच्या नो बॉलने घात केला. श्रीलंकेविरुद्ध टी 20 सामन्यात अर्शदीपचे हेच नो-बॉल महाग पडले होते.
4 ओव्हरमध्ये दिल्या 51 धावा
कालच्या मॅचमध्ये अर्शदीपने 20 व्या ओव्हरमध्ये 27 रन्स दिले. नो बॉलमुळे अर्शदीपने एक बॉलमध्ये 13 रन्स दिले. डॅरिल मिचेलने त्याच्या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा लुटल्या, पहिल्या तीन चेंडूंवर तीन सिक्स त्यानंतर एक फोर मारला. त्यामुळे न्यूझीलंडची धावसंख्या 176 पर्यंत पोहोचली. रांचीमध्ये पहिल्या टी 20 सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह महागडा ठरला. त्याने 4 ओव्हर्समध्ये 51 रन्स देऊन फक्त 1 विकेट घेतला. श्रीलंकेविरुद्ध टी 20 सामन्यात अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये तीन नो बॉल टाकले होते.
अर्शदीप कुठे चुकतोय?
अर्शदीपचे इतके नो-बॉल पडतात, त्यामागे ओव्हर स्टेपिंग कारण आहे. गोलंदाजी करताना बऱ्याचदा त्याचा पाय रेषेबाहेर जातो. माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांनी अर्शदीपच्या गोलंदाजीतील त्रुटींवर बोट ठेवलं.
“अर्शदीप आज फार प्रभावी ठरला नाही. यॉर्कर टाकून बॅट्समनला अडचणीत आणण्यासाठी तो ओळखला जातो. पण आज त्याने तशी गोलंदाजी केली नाही. माझ्यामते त्याने त्याच्या बॉलिंगबद्दल विचारपूर्वक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. हा प्रवास आहे. तुम्हाला चांगली सुरुवात मिळेल. पण काही सामन्यांमध्ये तुमच्या कौशल्याची चाचणी होईल. तुमचा स्वत:वर किती विश्वास आहे आणि मूलभूत गोष्टींवर तुम्ही किती मेहनत घेता त्यावर यश अवलंबून आहे. त्याने या गोष्टींवर काम केलं तर त्यात अधिक सुधारणा होईल” असं बांगर म्हणाले.
लाँग रनअपमुळे नो बॉल का?
“नो बॉलच्या समस्येवर मात करण्यासाठी अर्शदीपने गोलंदाजी करताना त्याचा रन-अप कमी केला पाहिजे” असा सल्ला मोहम्मद कैफ यांनी दिला. “अर्शदीप खूप लांबून धावत येतो. याच लाँग रनअपमुळे ओव्हर स्टेपिंग होतेय. त्याची ऊर्जा सुद्धा तो यात वाया घालवतो. या नो बॉलला लाँग रनअप कारणीभूत आहे. तो साइड सुद्धा सतत बदलत असतो. कधी राऊंड द विकेट, कधी ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. त्याला बेसिक्सवर मेहनत घ्यावी लागेल.तो चांगला बॉलर आहे पण आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला नव्हता” असं कैफ म्हणाला. स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात ते बोलत होते.