मुंबई: बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket board) भारताचे माजी ऑलराऊंडर क्रिकेटपटू श्रीधरन श्रीराम (Sridharan Sriram) यांची आगामी आशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कपसाठी (T20 World cup) बांगलादेशच्या राष्ट्रीय संघाच्या कोचपदी निवड केली आहे. बीसीबीच्या एका संचालकाच्या हवाल्याने श्रीराम यांची नियुक्ती झाल्याचं ‘डेली स्टार’ने म्हटलं आहे. हो, आम्ही वर्ल्ड कप पर्यंत श्रीराम यांना कोच म्हणून नियुक्त केलं आहे. श्रीराम यांनी 2000 ते 2004 दरम्यान भारतासाठी आठ वनडे सामने खेळले होते. मागच्या आशिया कपच्या दोन फायनल मध्ये बांगलादेशचा पराभव झालाय. दोन्ही वेळा भारतीय संघ विजेता ठरला.
टी 20 वर्ल्ड कप लक्षात घेऊन, आम्ही पुढे जात आहोत, असं बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या एका संचालकाने सांगितलं. “आम्ही नवीन विचाराने पुढे जात आहोत. नव्या कोचची नियुक्ती आशिया कप स्पर्धेपासून केली आहे. टी 20 वर्ल्ड कप आमचं मुख्य लक्ष्य आहे. त्यामुळे आशिया कप आधी नियुक्ती आवश्यक होती. जेणेकरुन त्यांना पूर्ण वेळ मिळेल” असं या संचालकाने सांगितलं.
श्रीराम ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक आणि स्पिन गोलंदाजी कोच होते. ऑस्ट्रेलियाचे माजी कोच डॅरन लीमन यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम यांना 2016 साली ऑस्ट्रेलियन स्पिन गोलंदाजी कोचची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी मागच्याच महिन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2010 आणि 2011 साली श्रीराम रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा भाग होते. 2019 साली आरसीबीसाठी बॅटिंग आणि स्पिन गोलंदाजी कोच म्हणून त्यांनी काम केलं होतं.