मुंबई: असद रौफ (Asad Rauf) यांची पाकिस्तानातील उत्तम अंपायर्समध्ये गणना होते. असद रौफ यांनी 13 वर्षाच्या करियरमध्ये 49 कसोटी, 98 वनडे आणि 23 टी 20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये अंपायरिंग केली आहे. पण आता याच असद रौफ यांचं आयुष्य पार बदलून गेलं आहे. ते लाहोरच्या (Lahore) एका बाजारात दुकान चालवतात. पोटपाण्यासाठी त्यांच्यावर बूट विकण्याची वेळ आली आहे. रौफ यांना आता क्रिकेटमध्ये अजिबात रस राहिलेला नाही. “मी इथे छोटासा सेटअप ठेवलाय. आयुष्य आहे, तो पर्यंत काम करायचय. मी अजून 66 वर्षांचा असून स्वत:च्या पायावर उभा आहे. लोकांनी स्वत:ला कामामध्ये व्यस्त ठेवलं पाहिजे. काम सोडलं, तर घरी बसावं लागेल” असं रौफ यांनी सांगितलं. असद रौफ यांच्यावर 2016 साली बीसीसीआयने (BCCI) पाच वर्षांची बंदी घातली. अनुशासन समितीला ते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहभागी असल्याचं आढळून आलं. रौफने सट्टेबाजांकडून मौल्यवान वस्तू घेतल्या. 2013 साली आयपीएलमधील मॅच फिक्सिं प्रकरणातही त्यांची भूमिका समोर आली होती.
2012 साली मुंबईतील एका मॉडेलने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळेही ते चर्चेत आले होते. लग्नाचं आश्वासन दिल्यामुळे रौफ यांच्याशी संबंध ठेवले, असं त्या मॉडेलने म्हटलं होतं. असद रौफ हे आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये होते. त्याने वर्ल्ड कॅपमध्येही अंपायरिंग केलीय. पण आज त्यांच्यावर उपजिवीकेसाठी रस्त्यावर दुकान थाटण्याची वेळ आलीय. “मी हे सर्व माझ्यासाठी नाही, स्टाफसाठी करतो. हे माझ्यासाठी नाही. माझ्या स्टाफच्या रोजी रोटीसाठी आहे. मी त्यांच्यासाठी काम करतो” असं त्यांनी पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
मॅच फिक्सिंगच्या आरोपांना 10 वर्ष झालीत. त्याचं आता मला दु:ख नाहीय. आता दुकान चालवून मी खुश आहे. मला पैशांची अडचण नाहीय, असंही त्यांनी स्पष्ट केलं. “जे करीन, त्यात टॉपवर जाण्याचा माझा स्वभाव आहे. मी एक दुकानदार म्हणून काम सुरु केलय. मी क्रिकेट खेळलो, तिथेही चांगलच नाव कमावलं. अंपायरींग सुरु केली, त्यावेळी सुद्धा टॉपवर जायचय हे मी स्वत:ला बजावलं होतं. माझ्या मनात आता स्वार्थाची भावना नाहीय. मी भरपूर पैसा बघितलाय., दुनिया बघितली आहे” असे रौफ म्हणाले.