मुंबई: नियती आणि नशिबापेक्षा कोणी मोठं नसतं. एखादी गोष्ट नियतीच्या मनात असेल, तर ती घडून राहते. राजाच्या घरात जन्माला येऊनही, एखादी व्यक्ती कमनशिबी ठरते. पण तेच रस्त्यावर जन्मलेलं एक अनाथ मुलही मोठं इतिहास घडवून जातं. जेव्हा आपल्याला हे समजतं, तेव्हा नियती आणि नशिबाच्या पुढे काही चालत नाही, ही गोष्ट आपल्या लक्षात येते. पुण्यासारख्या (Pune) मोठ्या शहराच्या एका कोपऱ्यात जन्मलेल्या अनाथ मुलीची ही गोष्ट आहे. कारण जन्मानंतर आई-वडिलांनी अडचणींमुळे तिला शहरातील अनाथालयात (Orphanage) सोडलं होतं. पण नियतीने या मुलीच्या नशिबात काहीतरी वेगळच लिहून ठेवलं होतं. आज या मुलीला जन्म देणारे आई-वडील आतल्या आत भरपूर रडत असतील, कारण ते आज जन्म दिलेल्या मुलीला भेटू शकत नाहीत. ही गोष्ट आहे, ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध यशस्वी क्रिकेटपटू (Lisa Sthalekar) लीजा स्टालगरची.
13 ऑगस्ट 1979 रोजी पुणे शहरातील एका छोट्याशा कोपऱ्यात लीजाचा जन्म झाला. लीजाचा स्वीकार करणं, तिच्या आई-वडिलांना शक्य नव्हतं, ही मुलगी म्हणजे आपल्यासाठी अडचण आहे, असं त्यांना वाटलं. त्यामुळे सकाळी-सकाळी त्यांनी पुण्यातील ‘श्रीवास्तव अनाथालया’त या मुलीला सोडलं. अनाथालयाने या गोंडस मुलीचं लैला असं नामकरण केलं.
त्या दिवसांमध्ये हरेन आणि सू नावाचं एक अमेरिकन जोडपं देश भ्रमंती करण्यासाठी भारतात आलं होतं. या जोडप्याला पहिल्यापासून एक मुलगी होती. भारतात एका मुलाला दत्तक घेण्याच्या उद्देशाने हे जोडपं इथे आलं होतं. ते सुंदर मुलाच्या शोधात आश्रमात आले. त्यान मनासारखा मुलगा मिळाला नाही. त्यावेळी ‘सू’ ची नजर लैलावर पडली. त्या मुलीच्या निरागस चेहरा आणि आकर्षक डोळ्यांनी हरेन आणि सू ला तिच्या प्रेमात पाडलं.
कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांनी लैलाला दत्तक घेतलं. ‘सू’ ने लैलाच नाव बदलून ‘लीज’ केलं. ते पुन्हा अमेरिकेला निघून गेले. काही वर्षानंतर हे जोडपं ऑस्ट्रेलिया सिडनी येथे स्थायिक झालं.
हरेनने लीजला क्रिकेट खेळायला शिकवलं. घरातील पटांगणातून लीजने क्रिकेट सुरु केलं. नंतर पुढ जाऊन ती गल्लीतल्या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागली. लीजला क्रिकेटचा प्रचंड वेड होतं. पण तिने तिच्या शिक्षणाला देखील तितकच महत्त्व दिलं. लीजने अभ्यासाबरोबर क्रिकेट प्रशिक्षण सुरु ठेवलं. पुढे तिने ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली. आता लीज पेक्षा तिची बॅटच जास्त बोलत होती. पुढे जाऊन तिने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं, अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले.
1997- न्यू साउथ वेल्स कडून पहिला सामना
2001- ऑस्ट्रेलिया कडून पहिली ODI
2003- ऑस्ट्रेलिया कडून पहिली टेस्ट
2005- ऑस्ट्रेलिया कडून पहिला टी20
आठ टेस्ट मॅच, 416 रन, 23 विकेट
125 वनडे, 2728 रन, 146 विकेट
54 टी-20, 769 रन, 60 विकेट
– वनडे मध्ये 1000 रन आणि 100 विकेट घेणारी लीज पहिली महिला क्रिकेटपटू आहे.
– आयसीसी रँकिंग प्रणाली सुरु झाली, तेव्हा ती नंबर एक ऑलराऊंडर होती.
– ऑस्ट्रेलियाकडून ती वनडे मध्ये वर्ल्ड कप खेळली.
– 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला. त्याच्या पुढच्याच दिवशी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून तिने निवृत्ती स्वीकारली.
– इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल (ICC) ने लीजा स्टालगरला आपल्या हॉल ऑफ फेम मध्ये तिला स्थान दिलं आहे.
प्रत्येक माणूस आपलं नशीब घेऊन जन्माला येतो. आई-वडिलांनी तिला अनाथालयात सोडलं. नियती तिला अमेरिकेत घेऊन गेली. हीच लीज ऑस्ट्रेलियाची कॅप्टन बनली. आज जगातील महान महिला क्रिकेटपटूंमध्ये तिची गणना होते.