कोलकाता: इडन गार्डन्सवर भारत-श्रीलंकेमध्ये दुसरा वनडे सामना झाला. गौतम गंभीर या मॅचमध्ये कॉमेंट्री करत होता. त्यावेळी त्याने वनडे वर्ल्ड कपबद्दल आपलं मत मांडलं. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. त्यासाठी त्याने काही खेळाडूंची नाव घेऊन भारतीय सिलेक्टर्सच काम सोपं केलं. भारत-श्रीलंका मॅच दरम्यान कॉमेंट्री करताना त्याने वर्ल्ड कपसाठी भारताची अर्धी टीम सांगितली. यात हैराण करणारी बाब म्हणजे गंभीरने टीम निवडताना रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विनच नाव घेतलं नाही.
त्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं
कोलकातामध्ये टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसरा वनडे सामना 4 विकेट आणि 40 चेंडू राखून जिंकला. या विजयासह टीम इंडियाने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमालीच प्रदर्शन केलं. खासकरुन कुलदीप यादवने आपल्या प्रदर्शनाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं.
गौतम गंभीरने वनडे वर्ल्ड कपसाठी निवडले 4 स्पिनर
कुलदीप यादवच्या याच प्रदर्शनाने गौतम गंभीरही प्रभावित झाला. गौतम गंभीरला कॉमेंट्री दरम्यान प्रश्न विचारण्यात आला. वर्ल्ड कपसाठी कुठल्या चार स्पिनर्सना टीममध्ये पहायला आवडेल? त्यावेळी त्याने अक्षर पटेलच पहिलं नाव घेतलं. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि रवी बिश्नोईचा उल्लेख केला.
गंभीर जाडेजाबद्दल काय म्हणाला?
गौतम गंभीरने रवींद्र जाडेजा आणि आर.अश्विन यांच नाव घेतलं नाही. अक्षर पटेल, कुलदीप यादव यांना टीम बाहेर ठेवण्याच काही कारण नाहीय, असं गंभीर म्हणाला. अक्षरकडे जाडेजासारखच टॅलेंट आणि क्षमता आहे, असं गंभीर म्हणाला.
….म्हणून रवी बिश्नोई वर्ल्ड कप टीममध्ये हवा
रवी बिश्नोईची निवड का केली? त्यामागचा तर्कही गंभीरने सांगितला. मागच्यावर्षी दुबईत पाकिस्तान विरुद्ध केलेल्या गोलंदाजीच उदहारण दिलं. त्या टी 20 मॅचमध्ये भारत हरला. पण बिश्नोई आपली छाप उमटवण्यात यशस्वी ठरला. त्याने 4 पैकी 2 ओव्हर्स पावरप्लेमध्ये टाकल्या होत्या. यात त्याने बाबर आजमची विकेट काढली.
टीम इंडियाचा एक्स फॅक्टर कोण?
गौतम गंभीरने या चार स्पिनर्सशिवाय जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा वनडे वर्ल्ड कपमध्ये एक्स फॅक्टर असल्याच सांगितलं. बुमराहच खेळणं भारतासाठी आवश्यक असल्याच तो म्हणाला. बुमराह खेळला, तर भारतासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या होतील.