टीम इंडियाचा माजी ओपनर गौतम गंभीर एबी डी विलियर्स आणि केविन पीटरसन यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आहे. एबी डी विलियर्स आणि पीटरसन या दोघांनी चालू आयपीएल सीजनमधील हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर टीका केली होती. यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणार पहिला संघ ठरला. 13 सामन्यात फक्त 4 विजय मिळवून मुंबई इंडियन्सची टीम पॉइंट टेबलमध्ये तळाला आहे. हार्दिकवर बोलणाऱ्या डी विलियर्स आणि पीटरसनला गौतम गंभीरने उत्तर दिलं.
‘कॅप्टन म्हणून एबी डी विलियर्स आणि पीटरसन यांची कामगिरी फार प्रभावी नाहीय’ असं गौतम गंभीर स्पोर्ट्सकीडावरील चॅटमध्ये म्हणाला. “ते कॅप्टन होते, तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स काय होता?. कॅप्टन म्हणून एबी डी विलियर्स आणि केविन पीटरसन यांनी दमदार प्रदर्शन केल्याच मला दिसत नाही. तुम्ही लीडर म्हणून त्यांचा रेकॉर्ड पाहिला, तर फार चांगला नाहीय. स्वत:च्या व्यक्तीगत धावांपलीकडे एबी डी विलियर्सने आयपीएलमध्ये फार काही मिळवल्याच दिसत नाही” असं गौतम गंभीर म्हणाला.
‘सफरचंदाची संत्र्याबरोबर तुलना नको’
“संघाच्या दृष्टीने त्यांनी काही साध्य केल्याच मला तरी दिसत नाही. हार्दिक पांड्या आयपीएल विजेता कॅप्टन आहे. त्यामुळे संत्र्याची तुम्ही संत्र्याबरोबर तुलना करा. सफरचंदाची संत्र्याबरोबर तुलना नको” असं गौतम गंभीर म्हणाला होता.
गौतम गंभीरच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया
“गौतम गंभीरच्या या वक्तव्यावर भारताचे माजी क्रिकेटपटू अतुल वासन यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. “काय म्हणतोय तू? तो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला ती सवय आहे. मी गौतम गंभीरला अजिबात सीरीयसली घेत नाही” असं अतुल वासन इंडिया न्यूजवर म्हणाले. गौतम गंभीर सध्या कोलकाता नाइट रायडर्सची टीमचा मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक आहे. केकेआर आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचलीय.