कोलकाता: वेस्ट इंडिज विरुद्ध विराट कोहलीने (Virat kohli) केलेल्या आक्रमक फलंदाजीवर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काल विडिंज विरुद्धच्या (India vs West indies) दुसऱ्या टी 20 सामन्यात विराटने 41 चेंडूत 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. विराटच्या या आक्रमक फलंदाजीने अनेकांना प्रभावित केलं आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्करही (Sunil Gavaskar) याला अपवाद नाहीत. विराटने मैदानावर आल्यापासून गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने गोलंदाजांना कुठेही वरचढ होऊ दिले नाही. इशान किशन लवकर बाद झाल्यामुळे विराट कोहलीला पावरप्लेची काही षटक मिळाली. विराटने यामध्ये पाच चौकार लगावले. विराटने आधी कॅप्टन रोहित शर्मा आणि त्यानंतर ऋषभ पंत सोबत मिळून भारताच्या डावाला आकार दिला.
विराटने काल टी-20 मधलं 30 वं अर्धशतक झळकावलं. “विराटच्या कालच्या फलंदाजीमध्ये एक वेगळा दृष्टीकोन दिसला. विराटच्या बॅटमधून निघाणारे फटके पाहून डोळ्यांना खूप बरं वाटलं. त्याच्या फलंदाजीत वेगळा उद्देश दिसत होता” असं गावस्कर म्हणाले.
जमिनीलगतचे फटके खेळताना दिसला
“विराट ‘व्ही’ शेप मध्ये जमिनीलगतचे फटके खेळताना जास्त दिसतो. त्यामुळे कट सारखे नाजूक फटके सहसा पहायला मिळत नाहीत. काल विराटने कट सारखे काही हवाई फटके मारले. त्याच्या फलंदाजीमध्ये एक वेगळा उद्देश दिसत होता” असे गावस्कर म्हणाले. “आपण त्याच्या हेतूबद्दल बोलतोय. पण इशान किशनचा विकेट गेला, म्हणून त्याने गोलंदाजाला वरचढ होऊ दिलं नाही. तो उद्देश त्याच्या फलंदाजीत दिसत होता” असे गावस्कर म्हणाले.
कोहलीमुळे रोहितवर दबाव जाणवला नाही
एकेरी-दुहेरी धावा पळून निर्धाव चेंडू कमी करण्याच्या कोहलीच्या रणनितीचेही गावस्करांनी कौतुक केलं. कोहलीमुळे दबाव जाणवला नाही, असं रोहित स्वत: म्हणाला. “रोहित आज बॅटिंग करताना त्याच्या नेहमीच्या शैलीत दिसत नव्हता. त्यामुळे एकाने दुसऱ्याचा दबाव कमी केला पाहिजे” असं गावस्कर म्हणाले. कोहलीच्या 52 धावा आणि वेंकटेश अय्यर-ऋषभ पंतमध्ये झालेल्या 75 धावांच्या भागीदारीमुळे भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचली.
Gavaskar gives verdict on Virat Kohli’s aggressive batting in 2nd T20I vs WI