GT vs CSK IPL2023 : आयपीएल 2023 ची शानदार सुरुवात झाली आहे. लीगच्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सने चारवेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सला हरवलं. या सामन्यात गुजरात आणि चेन्नईमध्ये चांगली लढत पहायला मिळाली. पहिल्या सामन्यासह आयपीएलमध्ये नव्या नियमांची अमलबजावणी सुद्धा झाली. आयपीएल 2023 मध्ये काही नवीन नियम आलेत. यात इम्पॅक्ट प्लेयरचा एक नियम आहे. इम्पॅक्ट प्लेयरचा पहिल्याच सामन्यात दोन्ही टीम्सनी वापर केला. पण दोन्ही टीम्सचे इम्पॅक्ट प्लेयर प्रभाव पाडू शकले नाहीत.
चेन्नईने अंबाती रायुडूच्या जागी वेगवान गोलंदाज तृषार देशपांडेची इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवड केली. तेच गुजरात टायटन्सने केन विलियमसनच्या जागी साई सुदर्शनची निवड केली. केन विलियमसनला फिल्डिंग करताना दुखापत झाली. त्यामुळे त्याला रिप्लेस केलं. दोन्ही इम्पॅक्ट प्लेयरची सामन्यातील कामगिरी जाणून घेऊया.
गुजरातचा इम्पॅक्ट प्लेयर साई सुदर्शनचा परफॉर्मन्स कसा होता?
साई सुदर्शन स्पिन गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याची फलंदाजी सुद्धा चांगली आहे. या सामन्यात त्याला फक्त बॅटिंगची संधी मिळाली. पण तो फार काही करु शकला नाही. त्याने सुरुवात चांगली केली होती. पहिल्या चेंडूवर चौकार मारला. पण तो मोठी इनिंग खेळू शकला नाही. आपला पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरने त्याला 10 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. सुदर्शनने 17 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 22 धावा केल्या.
तृषार देशपांडे फेल
चेन्नईने दुसऱ्या इनिंगमध्ये आपली गोलंदाजी बळकट करण्यासाठी तृषार देशपांडेची इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवड केली. पण तो ही प्रभावी कामगिरी करु शकला नाही. त्याने शुभमन गिलच्या रुपात चेन्नईला एक मोठी विकेट मिळवून दिली. देशपांडेच्या चेंडूवर गिलने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. पण ऋतुराज गायकवाने कॅच पकडली. हा विकेट टीमसाठी खूप महत्वाचा होता.
देशपांडेला लास्ट ओव्हरमध्ये 8 धावांचा बचाव करता आला नाही. अखेरच्या ओव्हरमध्ये गुजरातला विजयापासून रोखण्यासाठी चेन्नईला 8 धावांचा बचाव करणं आवश्यक होतं. धोनीने आपल्या इम्पॅक्ट प्लेयरवर विश्वास दाखवला. पण दोन चेंडूत मॅच संपली. राहुल तेवतियाने लास्ट ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सिक्स आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारुन मॅच संपवली. तृषार देशपांडेने 3.2 ओव्हरमध्ये 51 धावा देऊन एक विकेट काढली.