मुंबई : कमी धावसंख्या असूनही गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) गोलंदाजांनी आज जबरदस्त कामगिरी केली. एकप्रकारे ही त्यांची परीक्षाच होती. त्यात ते पास झाले. गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) तब्बल 62 धावांनी पराभव केला. या विजयासह गुजरातचे 18 गुण झाले आहेत. गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातने लखनौला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य दिले होते. पण केएल राहुलच्या (KL Rahul) लखनौचा डाव 82 धावात आटोपला. राशिद खान आज आपल्या नावाला जागला. त्याच्या लेग ब्रेक गोलंदाजीने कमाल केली. चार ओव्हर्समध्ये 24 धावा देत त्याने चार विकेट घेतल्या. राशिद खानने ऑलराऊंडर दीपक हुड्डाला (27), कृणाल पंड्या (5), जेसन होल्डर (1) आणि आवशे खान (12) या विकेट काढल्या. कृणाल पंड्याचा विकेट तर अप्रतिम होता. राशिद खानने आज अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने कृणाला पंड्याला अप्रतिम गुगलीवर खेळण्यासाठी क्रीझ बाहेर आणलं. कृणालची पावलं क्रीझ बाहेर जाताच विकेटकीपर सहाने कुठलीही चूक केली नाही. त्याने लगेच स्टम्पिंग केलं.
राशिद खानने लखनौची कशी वाट लावली ते बघण्यासाठी इथे क्लिक करा
लखनौची भिस्त प्रामुख्याने कॅप्टन केएल राहुल आणि क्विंटन डि कॉक या जोडीवर होती. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालने क्विंटन डि कॉकला 11 धावांवर बाद केलं. त्यानंतर केएल राहुलला 8 धावांवर मोहम्मद शमीने सहाकरवी झेलबाद केलं. लखनौची इनिंग सुरु होण्याआधी ते हे लक्ष्य सहज गाठतील असं वाटलं होतं. पण गुजरातच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. पावरप्ले पूर्ण होण्याआधीच लखनौचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. लखनौकडून फक्त दीपक हुड्डाने सर्वाधिक 27 धावा केल्या. अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले.
गुजरातचा तारणहार शुभमन गिलची क्लासिक इनिंग इथे क्लिक करुन पहा
गुजरात टायटन्सच्या संघाला लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांनी 144 धावांवर रोखलं. गुजरातचे फक्त चार विकेट गेले. शुमभन गिलचं अर्धशतक आणि राहुल तेवतियाने अखेरीस केलेल्या फलंदाजीच्या बळावर गुजरातला 144 पर्यंत पोहोचता आला. सलामीवीर शुभमन गिलने 49 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या. यात सात चौकार होते. तेवतियाने 16 चेंडूत चार चौकारांसह 22 धावा केल्या. लखनौच्या गोलंदाजांनी आज सुपर कामगिरी केली. खासकरुन आवेश आणि मोहसीन खानने भेदक मारा केला. आवेश खानने मॅथ्यू वेड आणि हार्दिक पंड्या हे दोन महत्त्वाचे विकेटस मिळवले. डेविड मिलरने 24 चेंडूत 26 धावा केल्या. यात फक्त एक चौकार आणि एक षटकार होता.