अहमदाबाद : सीजनमधलं तिसरं शतक, आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या, अनेक विक्रम प्रस्थापित केले. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या क्वालिफायर मॅचमध्ये शुभमन गिलने हे सर्व काही केलं. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जेव्हा गुजरातला गरज होती, तेव्हा शुभमनची बॅट तळपली अन् गुजरातला फायनलमध्ये पोहोचवलं. असं असूनही शुभमन गिल बाद होऊनही नाराज होता. निराश होता. त्यामुळे शुभमन इतका निराश का होता? असा सवाल त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
शुभमन नाराज का होता? याचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊच. पण आधी त्याच्या धडाकेबाज कामगिरीकडे पाहूया. अहमदाबादमध्ये शुक्रवारी 26 मे रोजी संध्याकाळी थोडावेळ पाऊस झाला. त्यामुळे सामना अर्धा तास उशिराने सुरू झाला. पाऊस थांबल्यानंतर जेव्हा मॅच सुरू झाली तेव्हा शुभमनच्या बॅटीतून धावांचा पाऊस पडला. गिलने या सीजनमध्ये त्याचं तिसरं दमदार शतक ठोकलं. त्यामुळे गुजरातचा संघ मोठी धाव संख्या उभारू शकला.
शुभमनचं हे सीजनमधलं तिसरं शतक होतं. केवळ 49 चेंडूत त्याने शतकी खेळी केली होती. त्यानंतर 17 व्या ओव्हरमध्ये तो बाद झाला. त्याने 60 चेंडूंचा सामना केला आणि धुवाँधार 129 केल्या. त्याने आपल्या या इनिंगमध्ये 10 षटकार आणि 7 चौकार लगावले. त्याला आकाश मधवालने बाद केलं. एवढी मोठी खेळी करून तो बाद झाला. जेव्हा तो मैदानातून पव्हेलियनकडे जात होता. तेव्हा निराश होऊन मान हलवत होता. शुभमनला निराशेने मान हलवत जाताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं.
शुभमन नाराज का होता हे त्याने सांगितलं नाही. पण मॅचची स्थिती पाहून त्याच्या निराशेचं कारण समजू शकतं. खरं तर शुभमन जेव्हा बाद झाला तेव्हा गुजरातचा स्कोअर 16.5 ओव्हमध्ये 192 असा होता. हा स्कोअर पुरेसा होता. पण त्याने तो समाधानी नव्हता. त्यामुळेच त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती.
Ladies and gentlemen, fasten your seatbelts. Gill is shooting to thrill at the Narendra Modi stadium! ?#GTvMI #IPLPlayoffs #TATAIPL #IPLonJioCinema #IPL2023 pic.twitter.com/81BglBFAZK
— JioCinema (@JioCinema) May 26, 2023
शुभमन बाद झाला तेव्हा डेथ ओव्हर सुरू झाल्या होत्या. म्हणजे शेवटची षटकं. त्यामुळे टीमला तीन ओव्हरमध्ये अधिकाधिक धावांची गरज होती. अशावेळी खेळपट्टीवर शुभमनची गरज होती. केवळ तीन ओव्हर बाकी असताना कोणताही नवा खेळाडू मैदानात येऊन चौके, छक्के तर मारू शकला नसता. त्याने काही चेंडू वाया घालवले असते. दुसरीकडे शुभमन मैदानात सेट झाला होता. बाद झाला नसता तर त्याने आक्रमक फलंदाजी करत धाव फलक धावता ठेवला असता.
आपण बाद झाल्याने संघाचं नुकसान होणार आहे, हे त्याला माहीत होतं. तीन ओव्हर अशाच वाया जातील याची त्याला जाणीव होती. त्यामुळे तो मैदानातून जाताना प्रचंड निराश होता. मात्र, जेव्हा नवीन फलंदाजाने मैदानाचा ताबा घेतला, त्यानंतर शुभमनचा अंदाज फोल ठरला. गुजरातच्या संघाने 3.1 ओव्हरमध्ये 41 धावा ठोकल्या. कर्णधार हार्दीक पांड्याने 13 चेंडूत 28 धावा केल्या. त्यामुळे तीन गड्यांच्या बदल्यात गुजरातच्या संघाने 233 धावा केल्या होत्या. एक मोठा स्कोअर टीमने केला होता. त्यामुळे पव्हेलियनमध्ये बसलेल्या शुभमननेही सुटकेचा नि:श्वास सोडला होता.