अहमदाबाद: पुढच्या महिन्यात गुजरात विधानसभेची निवडणूक होणार आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची बायको रिवाबा जाडेजा विधानसभेची निवडणूक लढवू शकते. रिवाबा जाडेजा भाजपाकडून निवडणूक मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. रिवाबाने 2019 साली भाजपामध्ये प्रवेश केला होता. विद्यमान आमदाराच्या जागी भाजपाकडून रिवाबाला निवडणूक तिकीट मिळू शकतं. रिवाबाच्या उमेदवारीबद्दल अजून निश्चित काही ठरलेलं नाही.
आज भाजपाच्या केंद्रीय समितीची बैठक ?
भाजपाकडून लवकरच पहिली उमेदवार यादी जाहीर केली जाऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मंगळवारी गुजरात प्रदेशच्या कोअर ग्रुपची भेट घेतली. यात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील आहेत. आज भाजपाच्या केंद्रीय समितीची बैठक होऊ शकते.
गुजरात भाजपाचा बालेकिल्ला
तीन वर्षापूर्वी रिवाबाने भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी तिने जामनगर उत्तरमधून तिकीट मागितल्याची चर्चा होती. सध्या इथून भाजपाचेच धर्मेंद्रसिंह जाडेजा आमदार आहेत. गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. मागच्या अनेक वर्षांपासून इथे भाजपाची सत्ता आहे. भाजपा यावेळी सुद्धा आपला गड कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
यावेळी गुजरातमध्ये तिरंगी लढत
2017 गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने 99 आणि काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या. यावेळी आम आदमी पार्टीच्या प्रवेशामुळे भाजपा, काँग्रेस आणि आप असा तिहेरी सामना रंगू शकतो.