गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाच्या वृ्त्तांची चर्चा सुरु होती. हार्दिक आणि नताशा यांच्यातील नात्यात कलह सुरु असल्यामुळेच आयपीएलमध्ये हार्दिकचा फॉर्म हवा तसा बघायला मिळाला नव्हता, अशी चर्चा होती. हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्यात सुरु असलेल्या वादळामुळे तो प्रचंड नैराश्यात असल्याची चर्चा होती. हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटाची बातमी जेव्हा समोर यायची तेव्हा त्यांच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जायची. दोघांनी इतका टोकाचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती त्यांच्या चाहत्यांकडून केली जात होती. पण अखेर चाहत्यांना अनपेक्षित आणि नकोशी असणारी बातमी आज खरी ठरली आहे. हार्दिक आणि नताशा दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपण परस्परांच्या सहमतीने घटस्फोट घेऊन वेगळं होतं असल्याचं स्पष्ट केलं आहे. हार्दिकने या पोस्टमधून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. आपल्यासाठी हा निर्णय घेणं खूप कठीण होतं, असंही हार्दिक आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.
हार्दिक पंड्या याने चार वर्षांपूर्वी पत्नी नताशा स्टेनकोविक हिच्यासोबत लग्न केलं होतं. हार्दिक आणि नताशा नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करायचे. त्यांना लॉकडाऊनच्या काळात धुमधडाक्यात लग्न करता आलं नव्हतं म्हणून त्यांनी पुन्हा राजस्थानमध्ये लग्न केलं होतं. या दाम्पत्याला एक मुलगा देखील आहे. पण हार्दिक आणि नताशा यांची प्रेम कहाणी आता एका खडतर वाटेवर येऊन पोहोचली आहे. काहीतरी असं व्हावं की पुन्हा दोघांनी एकत्र यावं, अशी प्रार्थना दोघांच्या चाहत्यांकडून केली जात आहे. पण गोष्टी आता खूप पुढे गेल्या आहेत. या जोडप्याची प्रेम कहाणी कोणत्याही चित्रपटाच्या कहाणीला लाजवेल अशीच होती.
हार्दिकला नताशावर पहिल्याच नजरेत प्रेम झालं होतं. दोघांची पहिली भेट ही 2018 मध्ये एका नाईट क्लबमध्ये झाली होती. यावेळी नताशादेखील हार्दिकला पाहताच त्याच्या प्रेमात पडली होती. यानंतर हार्दिकच्या वाढदिवसाला दोन्ही एकत्र दिसले होते. यानंतर दोघांच्या लव्ह स्टोरीच्या अफवा सुरु झाल्या होत्या. यानंतर काही दिवसांनी दोघं एकत्र काही ठिकाणी दिसू लागले, एकत्र इन्स्टावर पोस्ट करु लागले होते. त्यांच्या भेटीचा सिलसिला असाच सुरु असताना अचानक दोघांनी 2020 मध्ये आपल्या साखरपुड्याची घोषणा केली होती. यानंतर त्यांनी प्रेग्नेंसीची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यावेळी जगभरात कोरोना संकट होतं. त्यामुळे दोघांनी 31 मे 2020 ला कोर्ट मॅरेज केलं होतं. लग्नानंतर दोघांनी जुलै 2020 मध्ये मुलगा अगस्त्यला जन्म दिला होता.
या दरम्यान हार्दिक आणि नताशा हे आपल्या आयुष्याचे अनेक सुखद क्षण कॅमेऱ्यात कैद करायचे आणि आपापल्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट करायचे. त्यांचं लग्न झालं तेव्हा कोरोना संकट असल्यामुळे साध्या पद्धतीत त्यांना लग्न करावं लागलं होतं. त्यामुळे त्यांनी लग्नानंतर तीन वर्षांनी पुन्हा लग्न केलं होतं. दोघांनी फेब्रुवारी 2023 मध्ये राजस्थानच्या उदयपूर येथे ख्रिस्ती आणि हिंदू रितीरिवाजात लग्न केलं होतं. त्यांचा हा विवाहसोहळा अतिशय भव्यदिव्य होता. त्यांचे अनेक मित्र आणि कुटुंबिय या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते.
सर्व काही ठीक सुरु होतं. पण मे 2024 मध्ये अचानक हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या वृत्तांच्या चर्चा सुरु झाल्या. एका ‘रेडिटर’ने नताशा आणि हार्दिक यांच्या नात्यात सारं काही आलबेल आहे ना? असा संशय व्यक्त केला होता. नताशाने आपल्या इन्स्टाग्राम बायोमधून हार्दिकचं नाव हटवलं होतं. तसेच हार्दिक सोबतचे फोटोदेखील हटवले होते. हा मुद्दा या रेडिटरने उपस्थित केला होता.
नताशा स्टेनकोविक ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचा जन्म 4 मार्च 1992 मध्ये सर्बियामध्ये झाला होता. तिने मॉडेल म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. तिने 2013 मध्ये आलेल्या ‘सत्याग्रह’ चित्रपटात काम केलं होतं. नताशा नच बलिए 9 आणि बिग बॉस 8 मध्ये देखील प्रतिस्पर्धी होती. हार्दिकच्या आधी नताशा टीव्ही अभिनेता अली गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.