मुंबई: भारताने तिसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजवर 7 विकेट राखून एकतर्फी विजय मिळवला. या विजयानंतर भारत टी 20 सीरीज मध्ये 2-1 ने आघाडीवर आहे. सामना संपल्यानंतर ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने विजयाचं रहस्य सांगितलं. कॅप्टन रोहित शर्माने मला आणि अन्य खेळाडूंना मनासारखं खेळण्याच स्वातंत्र्य दिलं आहे, असं हार्दिक पंड्याने पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितलं. अशा प्रकारच्या अप्रोच मुळे खेळाडूंना अपयशानंतर अजून जास्त जबाबदारी मिळेल.
“भारतीय संघाच्या अप्रोच बद्दल बोलायच झाल्यास, त्याचं सर्वाधिक श्रेय कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडला जातं. खेळपट्टी मंद असल्याने त्यावर कसं खेळलं पाहिजे, याबद्दल आपण बोलत होतो. द्रविड आणि रोहित यांना असं वाटतं की, आम्ही निकालाची चिंता न करता, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चूका झाल्यात तर त्यातून शिकता येईल” असं हार्दिक म्हणाला. रोहित शर्माने सर्व खेळाडूंना मोकळीक दिलीय, असं हार्दिक म्हणाला. मग प्रश्न हा निर्माण होतो की, विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना या खेळाडूंवर काही बंधन होती का? शास्त्री आणि विराटची जोडी खेळाडूंवर दबाव टाकायची का?
टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या या टी 20 मालिकेत सूर्यकुमार यादवला ओपनिंगला पाठवण्याचा प्रयोग केला. दोन सामन्यात फेल गेल्यानंतर सूर्यकुमार तिसऱ्या सामन्यात चमकला. सूर्याने 44 चेंडूत नाबाद 76 धावा फटकावल्या. हार्दिक पंड्या त्याच्या इनिंगवर म्हणाला की, “सूर्यकुमार असामान्य खेळाडू आहे. तो जेव्हा शॉट्स खेळायला सुरुवात करतो, तेव्हा सगळे हैराण होतात. तिसऱ्या टी 20 सामन्यात ज्या प्रकारची फलंदाजी केली, ते बिलकुलही सोपं काम नव्हतं. सूर्यकुमार यादवने खूप मेहनत केलीय”