मुंबई : आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषकाच्या तारखा काही दिवसांपूर्वीच आयसीसीने जाहीर केल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी (17 ऑगस्ट) आयसीसीने सामन्यांंचे वेळापत्रकही जाहीर केले. त्यामुळे आता सर्व संघ आपआपली रणनीती ठरवत असून संघ बांधणीलाही सुरुवात झाली आहे. भारताकडे सद्यस्थितीला चांगल्या दर्जाचे अनेक खेळाडू असून अंतिम 11 मध्ये कोणाला स्थान द्यायचं? हा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर (BCCI) आहे. दरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्या (Hardik Pandya) मागील काही काळापासून फॉर्ममध्ये नसल्याने त्याचे संघातील स्थानही धोक्यात आले आहे.
हार्दीकची जागा घेण्यासाठी काही नवखे अष्टपैलू खेळाडू तयारच असल्याने हार्दीकचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अलीकडे भारतीय संघात शेवटपर्यंत फलंदाजी करणारे खेळाडू असल्याचे समोर आले आहे. मग ते श्रीलंका दौऱ्यातील दीपक चहरचे अर्धशतक असो किंवा लॉर्ड्सवर शमी-बुमराह जोडीची तुफान भागिदारी. त्यामुळे हार्दीकची जागा घेण्यासाठी अनेक खेळाडू असून यातील तीन खेळाडूंकडून हार्दीकची जागा घेण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
हार्दीकप्रमाणे स्फोटक फलंदाजी करत गोलंदाजीचा भारही पेलणारा शिवम दुबे (Shivam Dube) हे या तिघांमधील पहिलं नाव आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तम प्रदर्शन करणाऱ्या शिवमने आयपीएलमध्ये आरसीबीकडूनही चांगल प्रदर्शन केलं आहे. सध्या तो राजस्थान रॉयल्स संघात असून आगामी आयपीएल त्याच संघातील स्थान निश्चित करेल.
शिवमनंतर भारतीय संघात पंड्याची जागा घेण्यासाठी एक प्रबळ दावेदार म्हणजे पालघरचा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur). एक गोलंदाज म्हणून संघात असणारा शार्दूल फलंदाजीतही दिलासादायक कामगिरी करतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यात त्याने याचा प्रत्यय घडवून आणला होता. नुकतंच त्याने आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांत पदार्पण केलं असून 34.50 च्या सरासरीने 69 धावाही केल्या आहेत.
अखेरचा पण मजबूत पर्याय म्हटलं तर श्रीलंका दौऱ्यात सर्वांची मनं जिंकणारा दीपक चाहर (Deepak Chahar). एक मुख्य गोलंदाज असणाऱ्या दीपकने श्रीलंका दौऱ्यात अत्यंत महत्त्वाच्या क्षणी उत्कृष्ट असं अर्धशतक ठोकत श्रीलंकेच्या तोंडातून विजय हिसकावून आणला. त्यामुळे पंड्याच्या जागी तोही एक उत्तम पर्याय ठरु शकतो.
संबंधित बातम्या
(Hardik Pandya position in team indias t20 world cup squad is in danger)