मुंबई: भारतीय महिला क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. पहिल्या टी 20 मध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. या पराभवानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरने आम्ही जबरदस्ती खेळलो, असं म्हटलं आहे. या मॅचमध्ये 100 टक्के खेळण्यायोग्य स्थिती नव्हती, असं तिचं म्हणण आहे. भारत आणि इंग्लंडच्या महिला टीममध्ये चेस्टर ली स्ट्रीट येथे हा सामना खेळला गेला. पावसामुळे ही मॅच उशिराने सुरु झाली. पावसानंतर सामना सुरु झाला. त्यावेळी इंग्लंडने टॉस जिंकला व टीम इंडियाला फलंदाजीसाठी बोलावलं.
भारतीय महिला टीम मोठा स्कोर उभारु शकली नाही. त्यांनी 7 विकेट गमावून 132 धावा केल्या. इंग्लंडच्या टीमला या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यात अडचण आली नाही. फक्त 13 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून त्यांनी सहज हे टार्गेट गाठवलं. तीन मॅचच्या सीरीजमध्ये इंग्लंडची टीम 1-0 ने आघाडीवर आहे.
मैदान ओलं असल्यामुळे त्यावरुन घसरण्याची भिती होती. सहजतेने स्ट्रोक खेळता येतील, अशी खेळपट्टी नव्हती. टीम इंडियाला फिल्डिंग करताना अडचणी आल्या. टीमने कॅच सोडल्या व चेंडूला सुद्धा योग्य जज करु शकले नाहीत.
सामन्यानंतर हरमनप्रीत कौरने या पराभवाची कारणं सांगितली. “आम्ही जितक्या धावा केल्या पाहिजे होत्या, तितक्या धावा केल्या नाहीत. मला वाटतं आज आम्ही जबरदस्ती खेळलो. कारण स्थिती 100 टक्के खेळण्यायोग्य नव्हती. मुली आज ज्या पद्धतीने खेळल्या, निश्चित त्यामुळे मी आनंदी आहे. दुखापत होण्याचा धोका होता. पण तरीही त्या खेळण्यासाठी तयार होत्या. कुठल्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करु शकणारे टीममेट्स तुम्हाला हवे असतात. आमच्या टीमने प्रयत्न केले. त्यावर मी समाधानी आहे” असं हरमनप्रीत कौर म्हणाली.